बोलण्यासाठी नेले अन् गोळ्या झाडून मारले, अडीच तासांनंतर मिळाला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 10:38 AM2023-03-11T10:38:24+5:302023-03-11T10:40:28+5:30
नक्षल्यांनी घेतला बळी : प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न भंगले
रमेश मानगोनवार
भामरागड (गडचिरोली) : आई- वडील सधन शेतकरी. भामरागड तालुक्यातील मरदूरमधून अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन तो गडचिरोलीत आला. जोमाने तयारी सुरू केली होती. होळीसाठी गावी गेला अन् तेथेच तो नक्षल्यांची शिकार ठरला. शेतात काम करत असताना बोलण्यासाठी म्हणून त्याला गणवेशातील तीन नक्षली दूर घेऊन गेले, त्यानंतर त्याला गोळ्या झाडून संपविले व अडीच तासांनंतर त्याचा मृतदेह आढळला.
साईनाथ चैतू नरोटी (२६), असे त्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पदवीच्या अंतिम वर्षात शिकत होता. चैतू नरोटी हे मरदूर (ता. भामरागड) येथील रहिवासी. गावातील सधन शेतकऱ्यांत त्यांचा समावेश आहे. त्यांचा मुलगा साईनाथ लहानपणापासूनच हुशार होता, त्याला आई- वडिलांनी जिद्दीने शिकवले. तो होळीला गावी आला होता. त्याला परत जायचे होते; पण आई- वडिलांसह शेतात गेला. ९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता तीन नक्षली वेशभूषेत आले, बोलण्यासाठी म्हणून त्याला घेऊन गेले. त्यानंतर तो परतलाच नाही.
एका शेतकऱ्याने मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती दिली, त्यानंतर साईनाथ नरोटीच्या कुटुंबाने तिकडे धाव घेतली. चैतू नरोटे यांना तीन मुले, त्यापैकी थोरला शेती करतो, धाकला शिक्षण घेतो, तर मधवा असलेला साईनाथ हा गडचिरोली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. पोलिस भरतीतही त्याने नशीब अजमावले होते. दरम्यान, सायंकाळी मृतदेह नातेवाइकांकडे सोपविला. रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.
धुळवडीला गावी जाणे बेतले विद्यार्थ्याच्या जीवावर... नक्षल्यांनी गोळी झाडून केली हत्या
कुटुंबीयांना शोक अनावर
मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून आई- वडील व दोन भावंडांनी टाहो फोडला. आमच्या निष्पाप लेकराची काय चूक, त्याला का म्हणून मारले, असे म्हणत आई- वडिलांसह नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे भामरागड ग्रामीण रुग्णालय परिसरातील वातावरण सुन्न झाले होते.
भामरागड येथे त्याने शिक्षण घेतले होते, महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो चार ते पाच वर्षांपासून गडचिरोली येथे होता. काही एक चूक नसताना त्याची हत्या करण्यात आली. अधिकारी बनवून त्यास प्रशासकीय सेवेत पाठवायचे होते; पण आता सगळेच संपले.
- चैतू नरोटे, साईनाथचे वडील
मरदूर येथील घटनेतील संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. नारगुंड पोलिस घटनास्थळी गेले होते. मृत विद्यार्थी पोलिसांचा खबरी नव्हता; पण त्या संशयाने किंवा तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याने त्यास संपविले असावे, अशी प्राथमिक माहिती आहे. अधिक तपास सुरू आहे.
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली