राष्ट्रीय महामार्गावरील सोमनपल्लीचा नवनिर्मित पूल ठरला कुचकामी; पहिल्याच पावसाळ्यात पोलखोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2022 04:30 PM2022-08-04T16:30:27+5:302022-08-04T16:31:36+5:30
अयोग्य पद्धतीचे बांधकाम
कौसर खान
सिरोंचा (गडचिरोली) : तेलंगणापासून सुरू होणाऱ्या आणि छत्तीसगडमध्ये संपणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ मध्ये तीन राज्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. पण, या महामार्गावर सोमनपल्ली नाल्यावर उभारण्यात आलेला पूल पावसाळ्यात कुचकामी ठरत आहे. अयोग्य पद्धतीने करण्यात आलेल्या बांधकामावर मार्गावर पाणी साचून वाहतूक खोळंबते. या अयोग्य पद्धतीच्या बांधकामाची पावसाने पोलखोल केली असताना आता त्यात योग्य दुरूस्ती केली जाणार का?, असा प्रश्न कायम आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ हा सिरोंचा तालुक्यात ५६ किलोमीटरचा आहे. याची सुरुवात तेलंगणाच्या निजामाबादपासून होते. तो सिरोंचा तालुक्यातून पुढे छत्तीसगडच्या जगदलपूरपर्यंत जातो. तीन राज्यांना जोडणारा हा महामार्ग म्हणजे सुवर्णरेखाच आहे. पण, या मार्गात सिरोंचा तालुक्यात असलेला सोमनपल्ली नाला मोठा अडसर ठरला होता. सदर पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा नवीन सुधारित आराखडा तयार करून पुन्हा योग्य पद्धतीने रस्त्याचे बांधकाम केले नाही तर हा पूल आणि रस्ता पावसाळ्यात कुचकामी ठरणार आहे.
प्रगत राज्यात अप्रगत तंत्रज्ञान?
तेलंगणा आणि छत्तीसगड हे दोन्ही राज्य महाराष्ट्राच्या तुलनेत बरेच नवीन आणि अप्रगत मानले जातात. मात्र या महामार्गावरून प्रवास करणारे लोक तीनही राज्यांची तुलना करतात. हे करताना अशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गावर तेलंगणा किंवा छत्तीसगडमध्ये कुठेही अडथळा नाही, पण प्रगत म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील तंत्रज्ञान अप्रगत आहे का?, येथील अभियंत्यांचे ज्ञान कमकुवत आहे का?, असे प्रश्न प्रवासी करतात. कोट्यवधी रुपये खर्च करूनही महामार्गाच्या या दुरवस्थेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी भावना व्यक्त होत आहे.
चुकीच्या कामामुळे रस्त्यावर साचते पाणी
सिरोंचा या तालुका मुख्यालयापासून ४० कि.मी. अंतरावर असलेल्या सोमनपल्ली गावाजवळील नाल्यावर हा पूल बांधून जेमतेम एक वर्षही झालेले नाही. या पुलामुळे आता पावसाळ्यातही वाहतूक सुरळीत सुरू राहील असे वाटले असताना पहिल्याच पावसाने चुकीच्या बांधकामाची पोलखोल केली. रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यामुळे बऱ्याच वेळा वाहतूक खोळंबून राहात आहे. या चुकीची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.