जि. प. शाळांच्या नियमित शिक्षकांची संख्या आता घटणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 16:09 IST2024-09-10T16:08:50+5:302024-09-10T16:09:16+5:30
कंत्राटी शिक्षक भरणार : २० पेक्षा कमी पटसंख्येच्या जिल्ह्यात ६७० शाळा; शिक्षण क्षेत्रात नाराजी

The number of regular teachers of ZP schools will now decrease
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सहाशेवर शाळांमध्ये आता प्रत्येकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड-बीएडधारक तरुणाची नेमणूक केली जाणार आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील तेवढी पदे कायमचीच संपुष्टात येणार आहेत.
आरटीई' नुसार कमी पटसंख्या असतानाही त्या शाळांमध्ये दोन ते तीन शिक्षक कार्यरत होते. पटसंख्या जास्त असतानाही त्या शाळांना पुरेशा प्रमाणात शिक्षक मिळत नाहीत, अशी दुसरी बाजू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षण विभागाने 'समूह शाळा' हा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, 'गाव तेथे शाळा' ही संकल्पना मोडीत निघेल व त्या गावातील विद्यार्थी शाळा शिकणार नाहीत म्हणून त्याला सर्वच स्तरातून विरोध झाला. त्यामुळे शासनाला तो पॅटर्न गुंडाळून ठेवावा लागला. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये शालेय शिक्षण विभागाने त्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा निर्णय काढला. आता सेवानिवृत्त शिक्षकांबरोबरच डीएड-बीएड झालेल्या सुशिक्षित तरुणालाही संधी देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्यामुळे २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर नियमित शिक्षक राहणार नाहीत.
बेरोजगारांमध्ये असंतोष
पात्रताधारक बेरोजगार नियमित शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना, जि. प. शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा शासनाचा निर्णय चुकीचा आहे. या निर्णयाला डीटीएड, बीएड बेरोजगार उमेदवारांचा विरोध होत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नियमित शिक्षकांचीच नियुक्ती झाली पाहिजे, असा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांचा आग्रह आहे.
जास्त पटसंख्येच्या शाळेत होणार बदली
२० किवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषद शाळेत दोन नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची बदली जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशनाने करावी. दोन्ही शिक्षकांची इच्छुकता घेऊन दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असल्यास सेवाज्येष्ठ शिक्षकाला प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट करण्यात आले
२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची अशी आहे संख्या
गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी हे चार तालुके सुगम क्षेत्रात मोडतात, तर उर्वरित आठ तालुके अवघड क्षेत्रात मोडतात. २० पेक्षा कमी पटसंख्येच्या जिल्ह्यातील ६७० शाळा या आठ तालुक्यांत आहेत. यामध्ये मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा भामरागड तसेच कोरची, कुरखेडा व धानोरा आदी तालुक्यांचा समावेश आहे.