‘पांढऱ्या सोन्या’चे दर महिनाभरात एक हजाराने गडगडले; उत्पादक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 07:29 PM2023-05-22T19:29:40+5:302023-05-22T19:30:18+5:30
Gadchiroli News पांढरे साेने म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कापसाच्या दरात महिनाभरात एक हजार रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे दरवाढीच्या अपेक्षेने घरात ठेवलेला कापूस आता खरीप हंगामाच्या तोंडावर कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
गडचिराेली : पांढरे साेने म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कापसाच्या दरात महिनाभरात एक हजार रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे दरवाढीच्या अपेक्षेने घरात ठेवलेला कापूस आता खरीप हंगामाच्या तोंडावर कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आता कापसाला जिल्ह्यात ६ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. क्विंटलमागे जवळपास ८०० ते १ हजार रुपयांची झळ उत्पादकांना सोसावी लागत आहे.
कापसाला हमीभाव किती ?
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत याेजनेंतर्गत कापसाला हमीभाव दिला जाताे. कापसाच्या प्रकारानुसार हा भाव ठरविला आहे. २०२२-२३ करिता आखूड धाग्याच्या कापसाकरिता ६ हजार ८० रुपये तर लांब धाग्याच्या कापसाकरिता ६ हजार ३८० रुपये प्रतिक्विंटल दर आहे. काही जिल्ह्यांमध्ये हमीभाव केंद्रांवर शेतकरी कापसाची विक्री करतात; परंतु अधिक दर मिळावा यासाठी खुल्या बाजारातही विक्री माेठ्या प्रमाणात केली जाते.
पाच वर्षांत हमीभावात ९३० रुपयांची वृद्धी
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत याेजनेंतर्गत हमीभावात गेल्या पाच वर्षांत प्रतिक्विंटल ९३० रुपयांनी वृद्धी झाली. २०१८-१९ मध्ये आखूड धाग्याचा कापूस ५ हजार १५० तर लांब धाग्याचा कापूस ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दराने हमीभावात खरेदी केला जात हाेता. मागील वर्षीच्या हंगामात आखूड व लांब धाग्याच्या कापसाला अनुक्रमे ५ हजार ७२६ व ६ हजार २५ रुपये प्रतिक्विंटल भाव हाेता.
कापसाला १२ हजारांपर्यंत भाव मिळेल काय?
मागील वर्षी राज्यभरात कापूस पिकाचे दर अचानक वाढले. १२ ते १३ हजार रुपयांपर्यंत हे दर पाेहाेचले. त्यामुळे काही शेतकऱ्यांना वाढलेल्या भावाचा फायदा मिळाला. मात्र, यंदा दरवाढीची अपेक्षा फोल ठरली.
गडचिराेली जिल्ह्यात एकमेव जिनिंग असलेल्या अनखाेडा येथे सिराेंचा तालुक्यापासून शेतकरी कापूस विक्रीसाठी येतात. सध्या कापसाला ६ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. मागील वर्षीच्या नाेव्हेंबर महिन्यात कापसाला ९ हजार रुपये दर हाेता. त्यानंतर दरात घसरण झाली. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात ८ हजार रुपये दर हाेता. सध्या ६ हजार ९०० रुपये आहे.
-राजेश दिगारसे, जिनिंग चालक अनखाेडा
कापूस वेचणी झाल्यानंतर मी कापसाची विक्री अनखाेडा येथील जिनिंगमध्ये केली. तेथे कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार १०० रुपये दर मिळाला.
शेतकऱ्यांच्या मालाला अधिक भाव मिळेल तेव्हाच त्याचा लागवड खर्च भरून निघू शकताे.
-किशोर राऊत, शेतकरी मुरखळा माल
कापूस लागवडीपासून एकूणच उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्या मानाने शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. हमीभाव कमी असल्याने खुल्या बाजारात व्यापारीसुद्धा याेग्य भाव देत नाहीत. मी यावर्षी ७ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची विक्री केली.
-विकास तुंबडे, शेतकरी मुरखळा माल