चामोर्शी तालुक्यातील महसूल मंडळाच्या इमारतीचे हस्तांतरण झाले नाही.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 05:02 PM2024-05-14T17:02:56+5:302024-05-14T17:03:39+5:30
Gadchiroli : हस्तांतरणाआधीच 'महसूल'ची कार्यालये जीर्ण कोट्यवधींच्या इमारती ठरताहेत निरुपयोगी
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तलाठी कार्यालय व मंडल अधिकारी कार्यालयासाठी सुसज्ज इमारती व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने काही वर्षांपूर्वी बांधण्यात आली. परंतु सदर बांधकामे महसूल विभागास हस्तांतरण होण्याआधीच जीर्ण झाले. कोट्यवधी रुपये खर्चुन बांधलेल्या इमारती निरुपयोगी ठरत असल्याने त्यांचा उपयोग केव्हा होणार, असा सवाल नागरिकांचा आहे.
चामोर्शी तालुक्यात महसूल मंडल अधिकारी कार्यालये, तसेच तलाठी सज्जे बांधण्यात आले. या कार्यालयांचे हस्तांतरण न झाल्याने सध्या या कार्यालयासमोर झुडपे वाढली आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या कार्यालयाच्या देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष झाल्याने सध्या ते ओसाड पडले आहेत. नागरिकांची विविध कामे वेळीच व्हावी, तलाठी व मंडल अधिकारी हे वेळेवर उपस्थित राहावे यासाठी कार्यालये व निवासस्थाने बांधली. मात्र, या बांधकामाचे हस्तांतरण न झाल्याने कारभार सुरू होण्यापूर्वीच बांधकामे दिवसेंदिवस जीर्ण होत आहेत. कार्यालये सज्ज करून त्यांचे हस्तांतरण लवकर करून काम सुरू करावे, अशी मागणी भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक आशिष पिपरे व भाजप शहर महामंत्री रमेश अधिकारी यांनी केली.
कारभार भाड्याच्या खोलीतूनच
तालुक्यातील तलाठी कार्यालये व महसूल मंडल अधिकारी कार्यालयाचे कामकाज सध्या भाड्याच्याच खोलीतून सुरू आहे. ज्या नागरिकांच्या घरी हे कार्यालय भाड्याने घेतले आहे. त्यांचे भाडेसुद्धा वेळेवर मिळत नाही. एक-दोन वर्षांपासून भाडे शासनाकडे थकीत असल्याची ओरड घरमालकांची आहे.