सिरोंचाचे ग्रामीण रुग्णालयच आजारी; रुग्णांना घ्यावे लागतात तेलंगणात उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 02:36 PM2024-11-27T14:36:42+5:302024-11-27T14:40:16+5:30

मूलभूत सुविधांचा अभाव : रिक्त पदांमुळे सेवा झाली अस्थिपंजर, कर्मचारी, रुग्णांसह नातेवाईकांचीही होतेय गैरसोय

The rural hospital of Sironcha itself is sick; Patients have to get treatment in Telangana | सिरोंचाचे ग्रामीण रुग्णालयच आजारी; रुग्णांना घ्यावे लागतात तेलंगणात उपचार

The rural hospital of Sironcha itself is sick; Patients have to get treatment in Telangana

कौसर खान 
लोकमत न्यूज नेटवर्क 
सिराँचा:
येथील ग्रामीण रुग्णालय सध्या विविध समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे आणि महत्त्वाची अनेक पदे रिक्त असल्यामुळे या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे रुग्णालय जीवनावश्यक सेवांचे केंद्र मानले जात असले, तरी आज तेच रुग्णालय स्वच्छतेच्या आणि सुविधांच्या अभावामुळे त्यांच्यासाठी समस्यांचे केंद्र बनले आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त आहे. त्याशिवाय सहायक अधीक्षक, अधिपरिचारिका, सफाई कामगार आणि अन्य तांत्रिक पदेदेखील रिक्त आहेत. यामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनात आणि रुग्णसेवेत सातत्याने अडथळे निर्माण होत आहेत. 


महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे आरोग्यसेवांचे नियोजन आणि अंमलबजावणी दोन्ही ठप्प झाले आहे. डॉक्टर आणि अन्य तज्ज्ञ कर्मचारी नसल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अनेकदा योग्य उपचार मिळत नाहीत. यातूनच अनेक रुग्णांना उपचारांसाठी शेजारील तेलंगणा राज्यातील खासगी रुग्णालयात जाण्याची वेळ येते. ज्यामुळे गरीब रुग्णांच्या आर्थिक अडचणी अधिक गंभीर बनत आहेत.


सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात स्वच्छतेची अवस्था अत्यंत वाईट आहे. रुग्णालयाच्या आवारात सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसतात. भिंतींवर थुकीचे डाग आहेत आणि परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सफाई कामगार नसल्यामुळे रुग्णालयातील स्वच्छतेची जबाबदारी कोणीतरी घेईल, अशी स्थितीच उरली नाही. दंतरोगतज्ज्ञांच्या अनुपस्थितीत दंत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना भयंकर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच, स्वच्छतेच्या अभावामुळे रुग्णालयात संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती सतत निर्माण होते. रुग्णालय परिसरात भुंकणे आणि कचरा टाकणे हे सर्रास घडत असून, या प्रकारामुळे रुग्णांचे आरोग्य अधिक धोक्यात आले आहे.


या समस्यांची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. रिक्त पदांची भरती प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी. सफाई कामगार आणि डॉक्टरांची नियुक्ती करावी, तसेच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची व्यवस्था करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासन आणि सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. स्वच्छचतेबाबत सुधारणा करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करणे, रिक्त पदे त्वरित भरणे आणि आधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देणे, या बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे. 


स्त्रीरोगतज्ज्ञ नाही, रुग्णांना धाव घ्यावी लागते तेलंगणात 
सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नाही. त्यामुळे परिसरातील आदिवासी व ग्रामीण महिलांना स्त्रीसंबंधित आजारांवर उपचार घेण्यासाठी तेलंगणा राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागते. यामुळे महिलांच्या आरोग्यसेवेसाठी मोठा आर्थिक भुर्दंड त्यांच्यावर पडतो. महिला आणि प्रसुतीसंबंधित तातडीच्या सेवांसाठी आवश्यक डॉक्टर नसल्याने प्रसुतीदरम्यान गंभीर समस्या निर्माण होतात, अशा परिस्थितीत गर्भवती महिलांना दुसऱ्या राज्यात हलविले जाते, ज्यामुळे वेळेअभावी त्यांचे प्राणही धोक्यात येतात.


रुग्ण रेफरचे प्रमाण वाढले 
सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची कमतरता आहे. रक्तदाब, हृदयविकार, अपघात यांसारख्या तातडीच्या उपचारांसाठी आवश्यक उपकरणे आणि सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना इतरत्र हलविण्याची वेळ येते. विशेषतः इमर्जन्सी रुग्णांसाठी येथे कोणतीही योग्य व्यवस्था नाही. रुग्णांना अनेकवेळा तेलंगणा राज्यातील रुग्णालयांमध्ये हलवले जाते. हलविण्याच्या प्रक्रियेदरम्यान वेळेचा अपव्यय होतो आणि या विलंबामुळे रुग्णांचे जीव धोक्यात येतात. याच कारणामुळे काही रुग्णांचा वाटेतच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.


मशीन आहेत, मात्र तंत्रज्ञ केव्हा येणार? 
सिरोंचातील ग्रामीण रुग्णालयात एक्सरे, एसीजीसह आवश्यक त्या मशीन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र या ठिकाणी तंत्रज्ञानची वाणवा असल्याने या मशीनचा नियमित उपयोगही होत नाही, अशी माहिती आहे. दक्षिण भागातील आरोग्य सेवा केव्हा बळकट होणार, असा सवाल अहेरी उपविभागातील नागरिकांनी केला आहे. आता स्थापन होणाऱ्या नव्या सरकारने दक्षिण भागातील आरोग्य सेवा मजबुत करावी, रिक्तपदे भरावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.


महिला रुग्णांची होत आहे परवड 
सरकारने योग्य पावले उचलली नाहीत, तर रुग्णालयाची परिस्थिती आणखी बिकट होईल आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल. सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातील घाणीचे साम्राज्य, रिक्त पदे आणि तुटपुंजी वैद्यकीय सुविधा या समस्यांनी येथील आरोग्यसेवा धोक्यात आणली आहे. विशेषतः महिलांना, आदिवासी समाजाला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या समस्यांचा मोठा फटका बसत आहे. विशेष म्हणजे, येथे महिला रुग्णांची मोठ्या प्रमाणात परवड होत आहे


"आम्ही सध्याच्या उपलब्ध सुविधांसह रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. मात्र, स्वच्छतेचा अभाव आणि रिक्त पदे यामुळे आमच्याही कामात अडथळे निर्माण होत आहेत. घाण पसरविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी सूचना फलक जागोजागी लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा नागरिकांनी स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे. स्वच्छता कर्मचारी, आधुनिक उपकरणे आणि आवश्यक तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे."
- हितेश वंजारी, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, सिरोंचा

Web Title: The rural hospital of Sironcha itself is sick; Patients have to get treatment in Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.