भरधाव ट्रक आधी खांबाला धडकला नंतर झाडावर आदळला
By संजय तिपाले | Published: February 27, 2024 07:25 PM2024-02-27T19:25:26+5:302024-02-27T19:25:42+5:30
कोरची येथील घटना : सुदैवाने जीवितहानी टळली
गडचिरोली : बंगळुरुवरून केसिंग पाईप घेऊन छत्तीसगड राज्यातील डोंगरगावला निघालेला ट्रक आधी विद्युत खांबावर व नंतर झाडावर आदळला. ट्रकचे मोठे नुकसान झाले, पण सुदैवाने जीवितहानी टळली. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास येथील वनश्री महाविद्यालयासमोर घडली.
येथील वनश्री महाविद्यालयासमोरून ट्रक (सी.जी. ०४ एमजी- ६७२३) जात होता.विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने कट मारल्यामुळे वाहन चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि रस्त्यानजीकच्या विद्युत खांब तोडून ट्रक झाडावर आदळला. सुदैवाने जीवित हानी टळली परंतु ट्रकचासमोरील भाग पूर्णतः क्षतीग्रस्त झाला. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. चालक जसवंतसिंग रघुनाथसिंग पटेल (वय २४ वर्षे, रा. रनखुरिया, देवरी, ता. शिवराज, जि. जबलपूर ) हा जखमी झाला आहे.
अपघात झाल्यानंतर विद्युत खांब तुटल्याची माहिती विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांना मिळाली. तातडीने विद्युत पुरवठा बंद केला.१०८ रुग्णवाहिकेतून जखमी चालकास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत यांनी जखमी चालक जसवंतसिंग पटेल यांच्यावर उपचार केले. कोरची पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अपघातग्रस्त ट्रक हटवला आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.