सीटी-1 नावाची दहशत संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 11:18 PM2022-10-13T23:18:33+5:302022-10-13T23:19:26+5:30
सीटी-१ या वाघाने गडचिरोली जिल्ह्यात सहा मानवी शिकार केल्या आहेत. त्यात पहिली शिकार वडसा वनपरिक्षेत्रात १४ एप्रिल रोजी, दुसरी याच क्षेत्रात ३ मे रोजी, तिसरी आरमोरी क्षेत्रात १६ जून रोजी, त्यानंतर २६ आणि २९ जूनला पोर्ला क्षेत्रात, तर ८ सप्टेंबरला वडसा वनपरिक्षेत्रात शिकार केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा लाखांदूरकडे वळविला होता. पुन्हा तो वडसा क्षेत्रात आला होता. पण पुढील मानवी शिकार होण्याआधीच तो वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज/आरमोरी : गेल्या दहा महिन्यांपासून पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत आपली दहशत निर्माण करत १३ लोकांच्या अकाली मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सीटी-१ या वाघाला पकडण्यात यश आल्याने त्याच्या नावाची दहशत अखेर संपली. असे असले तरी टी-६ या नरभक्षी वाघिणीसह इतर वाघांचे अस्तित्व कायम असल्यामुळे नागरिकांना यापुढेही योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे राहणार आहे.
मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातून आलेल्या सीटी-१ वाघाचे हल्ले गेल्या काही दिवसात वाढले होते. त्यामुळे त्याला जेरबंद करण्यासाठी तिन्ही जिल्ह्यात विविध ठिकाणांहून बोलविलेल्या रेस्क्यू टीमला तो हुलकावणी देत होता. वाघाला जेरबंद करण्यासाठी अनेकदा बेट लावून सापळे रचण्यात आले होते; मात्र तो एका ठिकाणी स्थिर राहात नसल्याने वनविभागाने लावलेल्या जाळ्यात तो अडकत नव्हता. जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. ज्या भागात हा वाघ जात होता त्या भागातील जवळपासच्या गावात जाऊन वनविभागाचे कर्मचारी लोकांना जंगलात न जाण्याविषयी सांगत होते, मुणारी देत होते.
वडसा वनविभागातील आरमोरी, पोराला व वडसा या तिन्ही वनपरिक्षेत्रात या वाघाने हल्ले करून सहा जणांचा बळी घेतला. मात्र कित्येकदा शिकार केलेल्या ठिकाणी सापळा रचूनही तो जाळ्यात अडकत नव्हता. त्यामुळे सदर वाघाने वनविभागाची झोप उडविली होती.
अशा केल्या सीटी-१ने सहा मानवी शिकार
सीटी-१ या वाघाने गडचिरोली जिल्ह्यात सहा मानवी शिकार केल्या आहेत. त्यात पहिली शिकार वडसा वनपरिक्षेत्रात १४ एप्रिल रोजी, दुसरी याच क्षेत्रात ३ मे रोजी, तिसरी आरमोरी क्षेत्रात १६ जून रोजी, त्यानंतर २६ आणि २९ जूनला पोर्ला क्षेत्रात, तर ८ सप्टेंबरला वडसा वनपरिक्षेत्रात शिकार केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा लाखांदूरकडे वळविला होता. पुन्हा तो वडसा क्षेत्रात आला होता. पण पुढील मानवी शिकार होण्याआधीच तो वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
वारंवार सापळे लावूनही येत नव्हते यश
- तिन्ही जिल्ह्यातील रेस्क्यू टीमला अनेक महिन्यांपासून गुंगारा देणारा हा वाघ अतिशय चतुर आहे. १७ डिसेंबर २०२१ रोजी चिमूर वनपरिक्षेत्रात या वाघाचे पहिली मानवी शिकार केली होती. मात्र अलीकडच्या काही दिवसात त्याच्या मानवी शिकारीचे प्रमाण वाढतच होते. वारंवार सापळे लावूनही तो सापडत नसल्याने वनविभागाचे टेन्शनही वाढले होते. शेवटी आठ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले.
नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे
अनेक लोकांचा बळी घेणाऱ्या सीटी-१ या वाघाला जेरबंद करण्यात यश आले असले तरी नागरिकांनी बिनधास्तपणे जंगलात जाण्याचे टाळावे. वडसा आणि गडचिरोली वनविभागात इतर वाघांचा वावर असल्याने लोकांनी जंगलात जाणे टाळावे, असे आवाहन गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी केले आहे.