‘वाघ येत आहे, आम्ही मरतो’, महिला पळाल्या अन् ताराबाईच ठरली बळी !
By गेापाल लाजुरकर | Published: October 19, 2023 04:50 PM2023-10-19T16:50:31+5:302023-10-19T16:52:42+5:30
धान कापताना हल्ला : रामाळा-वैरागड मार्गालगच्या शेतातील घटना
गडचिरोली : ‘जंगलातून शेताच्या पाळीने वाघ येत आहे. हा वाघ आपल्याला ठार करेल’ असे महिला मजुरांना ताराबाईने ओरडून सांगितले. तेव्हा इतर महिलांनी जिवाच्या आकांताने बांधीतून पळ काढला अन् वाघाने ताराबाईवरच झडप घालून तिला ठार केले. ही थरारक घटना आरमोरी तालुक्याच्या रामाळा-वैरागड मार्गालगत एका शेतात गुरूवार १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली.
ताराबाई एकनाथ धोडरे (वय ६०) रा. काळागोटा (आरमोरी) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. आरमोरी तालुक्याच्या रामाळा-वैरागड जंगल परिसरात मागील २० दिवसांपासून तीन वाघांचा मुक्त संचार आहे. तिन्ही वाघ दिवस-रात्र रस्त्याच्या कडेला, शेतशिवारात फिरत असतात. सध्या धान कापणीचा हंगाम सुरू झाला आहे. रामाळा येथील अमोल धोडरे यांच्या शेतात गेल्या चार दिवसांपासून धान कापणीचे काम सुरू आहे. रोजच्याप्रमाणे गुरूवारी शेतात सहा महिला धान कापणीचे काम करत होत्या. ताराबाई ही बांधीच्या पाळीलगत होती.
शेताच्या काही अंतरावर असलेल्या जंगलाच्या झुडपात दडून बसलेला वाघ महिलांच्या दिशेने येऊ लागला. ताराबाईने वाघाला पाहिले व ती ‘वाघ येत आहे, आम्ही मरतो’ अशी जोरात ओरडली. क्षणाचाही विलंब न करता इतर पाच महिलांनी बांधीतून पळ काढला; परंतु ताराबाई ही वयस्क असल्याने ती जास्त धावू शकली नाही. वाघाने ताराबाईवर झडप घातली व तिला जंगलाच्या दिशेने १०० मीटरपर्यंत फरफटत नेत तिला ठार केले.
घटनेची माहिती मिळताच लोकांनी गर्दी झाली. त्यानंतर वडसा वन विभागाचे सहायक वनसंरक्षक संदीप भारती, परिविक्षाधीन वन परिक्षेत्र अधिकारी पवनकुमार जोंग, वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, क्षेत्रसहायक राजेंद्र कुंभारे व वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केला. ताराबाई धोडरे यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली आहेत.
वर्षभरानंतर आरमोरी वनक्षेत्रातील दुसरी घटना
आरमोरी वन परिक्षेत्रात वर्षभरापूर्वी वाघाच्या हल्ल्यात रामाळा येथीलच एका व्यक्तीचा याच हंगामात मृत्यू झाला होता. धान बांधणीसाठी सिंध आणायला गेलेला व्यक्ती वाघाचा बळी ठरला होता. वर्षभरानंतर वाघाच्या हल्ल्यात महिला ठार होण्याची ही दुसरी घटना आहे.
... तर वाचला असता जीव
वाघ दिसताच ताराबाई ओरडली. तेव्हा सर्व महिलांनी आरडाओरड जर केली असती तर वाघ पळून गेला असता; परंतु इतर पाच महिलांनी बांधीतून पळ काढल्याने ताराबाई एकटी पडली व तिला वाघाने ठार केले. एकजुटीतून वाघाला पळवून लावता येऊ शकत हाेते. मागील वर्षी चामोर्शी तालुक्याच्या एका गावातील एकट्या महिलेने विळ्याच्या भरवशावर वाघाचा समोरासमोर प्रतिकार करून त्याला पळवून लावले होते.