नदीतून जीवघेणा प्रवास करत गाठावे लागत आहे गाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 02:48 PM2024-08-05T14:48:47+5:302024-08-05T14:49:41+5:30

Gadchiroli : चारही बाजूने वेढलेल्या कर्जेलीवासीयांचे दुःख कधी संपणार?

The village has to be reached by a dangerous journey through the river | नदीतून जीवघेणा प्रवास करत गाठावे लागत आहे गाव

The village has to be reached by a dangerous journey through the river

कौसर खान
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोचा :
तालुका स्थळापासून ६४ कि.मी. अंतरावर असलेल्या रमेशगुडम ग्रामपंचायत अंतर्गत अतिदुर्गम गाव म्हणून कर्जेली या गावाची ओळख आहे. सिरोंचा तालुक्यातील हे शेवटचेच गाव. विपरीत भौगोलिक परिस्थिती आणि मोजक्याच लोकांची वस्ती, त्यामुळे आतापर्यंत या गावाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. देश स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे, मात्र येथील नागरिकांना बाराही महिने नावेनेच गाव गाठावे लागत आहे.


अतिदुर्गम कर्जली या गावाला जाण्यासाठी बारमाही पक्का रस्ताही झालेला नाही. पावसाळ्यात एका बाजूला रमेशगुडम नाला, दुसऱ्या बाजूला विडरघाट नाला, तिसऱ्या बाजूला इंद्रावती नदी अशा पद्धतीने हे गाव पाण्याने वेढलेले असते. गावातून बाहेर जाण्यासाठी नावेने जावे लागते. आजारी लोकांना, गरोदर मातांना प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगानूरला नेण्यासाठी नावेने गावातून बाहेर निघून बैलबंडीने मोठी कसरत करून जावे लागते. दरदिवशी या गावातील नागरिक, महिला, मुलांना नावेने प्रवास करावा लागत आहे.


तिन्ही बाजुने कर्जेली हे गाव पाण्याने वेढले आहे. उन्हाळ्यात दोन नाल्यांना पाणी कमी राहते. मात्र पावसाळ्यात या दोन्ही नाल्यांना पूर येते. या पुरातून मार्ग काढणे गावकऱ्यांसाठी कठीण होते. दुसरीकडे इंद्रावती नदी आहे, ती तर ओलांढणे अतिशय कठीण आहे.


आठ दिवसांनीच सुरळीत होते वीजपुरवठा
बऱ्याचदा अत्यावश्यक काम असल्यास तालुकास्तरावर पोहोचण्यासाठी विलंब होतो. प्रसंगी कुठेही मुक्काम करावा लागतो. दूरसंचार सेवा तर सोडा, वीजपुरवठा एकदा खंडित झाला की पूर्ववत सुरू होण्यासाठी आठवडा लागतो. त्यामुळे या गावाचा तालुक्याशी नेहमीच संपर्क तुटलेला असतो. 
गावाची लोकसंख्या ५०० च्या जवळपास आहे. रेशनचे धान्य आणण्यासाठी रमेशगुडम येथे नावेनेच जावे लागते. शासनाने या ठिकाणी पुलाची निर्मिती करणे आवश्यक आहे. पूल झाल्यास या नागरिकांचा जीवघेणा प्रवास थांबण्यास मदत होईल.


एकमेव टॅक्सीचा नागरिकांना आधार
या भागात चालणारी एकमेव खासगी टॅक्सी रमेशगुडमवरून चालते. या टॅक्सीने कर्जेलीवासीय तालुक्याला येतात. या गावाला बारमाही रस्ता झाल्यास गावकरी मुख्य प्रवाहात येऊ शकतात. शासनाच्या योजना या गावात कशा पोहोचतात माहीत नाही. अविकसित आणि प्रगत्तीपासून कोसो दूर असलेल्या या गावात विकासाचा चिखलातून मार्ग काढत पावसाच्या दिवसामध्ये नावेतून गावाबाहेर पडावे लागते.
 

Web Title: The village has to be reached by a dangerous journey through the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.