आठवडाभरात वन्यप्राण्याने आणखी घेतला तिसरा बळी, महिला ठार; कुरखेडा तालुक्यातील घटना

By गेापाल लाजुरकर | Published: October 21, 2023 05:03 PM2023-10-21T17:03:35+5:302023-10-21T17:03:54+5:30

बिबट्याने ठार केल्याचा संशय

The wild animal took third victim within a week, a woman was killed; Incidents in Kurkheda Taluka | आठवडाभरात वन्यप्राण्याने आणखी घेतला तिसरा बळी, महिला ठार; कुरखेडा तालुक्यातील घटना

आठवडाभरात वन्यप्राण्याने आणखी घेतला तिसरा बळी, महिला ठार; कुरखेडा तालुक्यातील घटना

गडचिरोली : शेतीलगतच्या जंगलात सरपण गोळा करण्यासाठी व झाडू कापण्यासाठी गेलेली महिला वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झाली. ही घटना कुरखेडा तालुक्याच्या चिचेवाडा बिटातील ठुसी येथे शनिवार २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. या महिलेवर बिबट्याने हल्ला केला असावा, असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आठवडाभरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मानवी बळी जाण्याची ही तिसरी घटना आहे.

सायत्रा अंताराम बोगा (५५) रा. ठुसी असे वन्यप्राण्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. सायत्राबाई ही सकाळीच आपल्या शेतात गेली हाेती. शेतातील कामे आटोपून सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतालगतच्या जंगलात सरपण जमा करण्यासाठी व झाडू कापण्यासाठी गेली; परंतु बराच वेळ होऊन ती परत आली नाही. सायत्राबाई जंगलातून का परत आली नाही. याचा शोध सोबत गेलेल्या व परिसरातील शेतात असलेल्या लोकांनी घेतला असता. जंगलालगतच्या शेत शिवारात सायत्राबाईचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर वेळीच वनविभागाला माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच देलनवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहेर यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या परिसरात वाघाचा वावर नसल्याने सायत्राबाईंना बिबट्याने ठार केले असावे, असा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी मेहेर यांनी व्यक्त केला. सायत्राबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे आहेत.

चिचेवाडा बिटात सध्यातरी वाघाचे लोकेशन नाही. त्यामुळे सायत्रा बाेगा ही महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळावर हल्लेखोर प्राण्याचे पायाचे ठसे तज्ज्ञ चमूकडून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. या चमूच्या अहवालानंतरच हल्ला करणारा प्राणी वाघ की बिबट हे स्पष्ट होईल.

- संजय मेहेर, वन परिक्षेत्र अधिकारी देलनवा

Web Title: The wild animal took third victim within a week, a woman was killed; Incidents in Kurkheda Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.