चोरीकांडाचा सूत्रधार आठ वर्षांपूर्वीचा आरोपी
By admin | Published: September 28, 2016 02:26 AM2016-09-28T02:26:25+5:302016-09-28T02:26:25+5:30
गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह परराज्यीय खुल्या बाजारात चोरीच्या दुचाकी विक्री करणाऱ्या त्रिकुटातील प्रमुख सूत्रधार
सिरोंचा दुचाकी प्रकरण : खंडणी प्रकरणातही होता समावेश
सिरोंचा : गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह परराज्यीय खुल्या बाजारात चोरीच्या दुचाकी विक्री करणाऱ्या त्रिकुटातील प्रमुख सूत्रधार हा गडचिरोली पोलीस दलातील माजी शिपाई आहे. ६ आॅगस्ट २००८ रोजी गुरूवारला सीमावर्तीय आंध्रच्या अंबडपल्ली येथे एका सरपंच महिलेस पिस्तुलाचा धाक दाखवून ५० हजाराची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली महादेवपूर पोलिसांनी त्याला अटक केली होती. सदर मुख्य आरोपीचे नाव मधुकर समय्या तुलसीगारी (३३) असून तो सिरोंचा येथील रहिवासी आहे.
प्रस्तुत घटनेच्या कालावधीत तो एटापल्ली तालुक्यातील कसनसूर उपपोलीस ठाण्यात कार्यरत होता. पोलीस कारवाईच्या पुढील टप्प्यात सिरोंचा येथील त्याच्या राहत्या घरून सरकारी पिस्तुल जप्त करण्यात सिरोंचा पोलिसांनी यश मिळविले. येथेही त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला. तपासकार्याच्या घटनाक्रमादरम्यान कसनसूर ठाण्यातही गुन्हा नोंद झाला. अंबडपल्लीच्या सरपंच सुलोचना कृष्णाराव तोपुचेर्ला यांच्या घरात रात्री अनधिकृत प्रवेश करून ५० हजार रूपयांची खंडणी मागितली. यावेळी त्याचा अन्य साथीदार रमेश अंकुलू नारम सोबत होता. मात्र तो पळून गेला. तथापी सिलोचना यांनी मधुकरसह त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
८ आॅगस्ट २००८ रोजी महादेवपूर पोलीस ठाण्यात मधुकर तुलसीगारी विरूध्द अपराध संख्या ६३/०८ भादंविचे कलम ४४८, ३८५, ५०६, ३४ अन्वये गुन्हा पंजीबध्द झाला. सिरोंचाचे तत्कालीन प्रभारी अधिकार रघुनाथ नाचन व पोलीस उपनिरिक्षक सुरेश चिल्लावार यांनी मधुकर कडून सरकारी पिस्तुल, १० जीवंत काडतूस जप्त करून ११ आॅगस्ट रोजी भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, २७ नुसार गुन्हा दाखल केला. कसनसूरचे प्रभारी पोलीस अधिकारी मुरलीधर खोकले यांनी तुलसीगारी विरूध्द ९ आॅगस्ट २००८ रोजी भादंविचे कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
विभागीय चौकशीच्या पुढील टप्प्यात भारतीय संविधानाच्या कलम ३११ ब अन्वये मधुकर तुलसीगारीला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. या शास्तीविरूध्द त्याने महाराष्ट्र प्राधिकरण (मॅथ) येथे याचिका क्रमांक ४२४/२००९ दाखल केली. याचिकेचा निकाल एकतर्फी लागून १६ आॅक्टोबर २०१० अन्वये त्याला वेतन व भत्ते अनुज्ञेय करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)