दोटकुलीत तीन लाख रुपयांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:26 AM2019-02-20T00:26:43+5:302019-02-20T00:27:27+5:30
तालुका मुख्यालयापासून १४ किमी अंतरावर असलेल्या दोटकुली येथील घनश्याम कवडू पोरटे यांच्या घरातील ३ लाख ४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली. सदर घटना सोमवारी रात्री ८ ते ११ वाजताच्या सुमारास घडली. चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तालुका मुख्यालयापासून १४ किमी अंतरावर असलेल्या दोटकुली येथील घनश्याम कवडू पोरटे यांच्या घरातील ३ लाख ४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यानेचोरून नेली. सदर घटना सोमवारी रात्री ८ ते ११ वाजताच्या सुमारास घडली. चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
लोमेश उर्फ पुरूषोत्तम ठोबे (२४) रा. दोटकुली असे चोरट्याचे नाव आहे. पोरटे हे फर्निचरचा दुकान टाकणार आहेत. यासाठी त्यांनी ३ लाख ४ हजार रुपये रोकड जमा करून ठेवली होती. १८ फेब्रुवारी रोजी रात्री पोरटे कुटुंब गावातील सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. त्याच रात्री लोमेश ठोबे याने घराचा मागच्या दरवाजाच्या लोखंडी कळ्या तोडून घरात प्रवेश केला. आलमारीचा कब्जा तोडून आलमारीतील ३ लाख ४ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. सांस्कृतिक कार्यक्रम पाहून पोरटे कुटुंब घरी परत आल्यानंतर मागचा दरवाजा व आलमारी तोडून असल्याचे दिसून आले. आलमारीची तपासणी केली असता, रोकड गायब झाली होती. तक्रार चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. एसडीपीओ विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रकाश तुनकलवार, पीएसआय सुरेश घोडाम, निशा खोब्रागडे, पोलीस हवालदार श्यामराव वडेट्टीवार, राजू उराडे, दुलाल मंडल, ज्ञानेश्वर लाकडे, विनोद कुनघाडकर यांनी तपासाची चक्रे फिरवून एका दिवसातच आरोपीला अटक केली.
धानोरात दोन ठिकाणी घरफोडी
धानोरा येथील विद्यानगर वार्डातील दोन घरी चोरी झाल्याचे सोमवारी उघडकीस आले आहे. विद्यानगरातील रहिवासी मोतीराम सिध्दु कोडाप हे मुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. ते रविवारी गोंदिया जिल्ह्यातील कचारगड येथे सहपरिवार यात्रेकरिता गेले होते. दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री १२.३० वाजता घरी परत आले असता, घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी आलमारी तोडून दोन सोन्याचे गोफ, अंगठी, रिंग, मंगळसूत्र व सहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४८ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. विद्यानगर येथीलच रहिवासी विलास गेडाम हे रविवारी धानोरा येथेच नातेवाईकाच्या घरी लग्नकार्यासाठी गेले होते. रात्र झाल्याने नातेवाईकाकडेच थांबले. दुसºया दिवशी घरी गेले असता, दरवाजाचे कुलूप तोडले असल्याचे लक्षात आले. मात्र चोरट्यांना आलमारी फोडता आली नाही. गेडाम यांच्या घरी चोरी झाली नाही. मोतीराम कोडाप यांनी चोरीची तक्रार धानोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक रमेश बासनवार करीत आहेत.