जीव धाेक्यात घालून वाहनाच्या टपावर बसून ‘त्यांचा’ प्रवास; प्रशासनाची डाेळेझाक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 06:16 PM2023-02-11T18:16:21+5:302023-02-11T18:19:12+5:30

रस्त्याअभावी एसटी नाही, खासगी वाहनांचा घ्यावा लागतो आधार

'Their' journey by risking their lives and sitting on the back of the vehicle due to bad road and no st bus service | जीव धाेक्यात घालून वाहनाच्या टपावर बसून ‘त्यांचा’ प्रवास; प्रशासनाची डाेळेझाक

जीव धाेक्यात घालून वाहनाच्या टपावर बसून ‘त्यांचा’ प्रवास; प्रशासनाची डाेळेझाक

Next

रविकुमार येमुर्ला

रेगुंठा (गडचिरोली) : सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा परिसर म्हणजे डोंगराळ भाग. या भागातील जवळपास २० गावांना जाण्यासाठी पक्के रस्तेच नाहीत. कुठे रस्ते आहे तर नाल्यांवर पूल नाही. त्यामुळे उन्हाळा सोडल्यास या भागातील नागरिकांना एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी चक्क खासगी प्रवासी वाहनांच्या टपावर बसून धोकादायक प्रवास करावा लागतो. हे चित्र पाहताच कुणाला आपण यूपी, बिहारमध्ये तर पाेहाेचलाे नाही ना, असे वाटते; पण गडचिराेली जिल्ह्यातील या धक्कादायक वास्तवाकडे अजूनही प्रशासनाची डाेळेझाक सुरू असल्याचे प्रत्यक्ष चित्र आहे.

रेगुंठा परिसरातील नागरिकांसाठी गडचिरोली ते रेगुंठा अशी एक बसफेरी, तसेच सिरोंचावरून रेगुंठा, बेज्जूरुपल्ली मार्गावर काही बसफेऱ्या सुरू होत्या. त्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी तालुका मुख्यालय आणि जिल्हा मुख्यालयी येणे-जाणे करणे सोयीस्कर जात होते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या बंद झाल्या, त्या पुन्हा सुरूच झाल्या नाहीत. आता नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घेण्याशिवाय पर्याय नाही. डोंगराळ भाग, कच्चे रस्ते आणि मोजकीच वाहने यामुळे वाहनाच्या आत बसायला जागा नसणारे चक्क टपावर बसून प्रवास करतात.

...हे अजूनही क्वॉरंटाईन

कोरोनाच्या लॉकडाऊनपासून एसटी महामंडळाने बसफेऱ्या पूर्णपणे बंद केल्या आहेत. कोरोनाकाळ संपल्यानंतर इतरत्र सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू झाले असले तरी एसटी महामंडळाने रेगुंठा परिसरातील नागरिकांना अजूनही ‘क्वॉरंटाईन’च ठेवले आहे. निसरडे कच्चे रस्ते, पुलाचे अर्धवट काम यामुळे त्या भागात एसटीच्या फेऱ्या सुरू करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालू शकत नाही, असे एसटीच्या अहेरी आगाराचे म्हणणे आहे.

‘त्या’ कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार

मुळात गेल्या कित्येक वर्षात या भागातील रस्ते आणि नाल्यांवर उंच पूल का बांधले गेले नाही, या प्रश्नाचा मागोवा घेतला असता अनेक बाबी स्पष्ट झाल्या. या कामात आधी वनकायद्याची अडचण होती. अलीकडे ती अडचण दूर झाली; पण ज्या कंत्राटदाराकडे हे काम होते त्याने ते अर्धवट स्थितीत सोडून दिले. त्यामुळे आता त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून या अर्धवट कामांसाठी नव्याने निविदा काढली जाणार असल्याचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपकार्यकारी अभियंता एन. आर. चिंतलवार यांनी सांगितले.

Web Title: 'Their' journey by risking their lives and sitting on the back of the vehicle due to bad road and no st bus service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.