"फोडाफोडी करणाऱ्या भाजपला त्यांचेच आमदार हात दाखवतील"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 11:49 AM2023-07-13T11:49:09+5:302023-07-13T11:50:34+5:30
८३ वर्षांच्या बापाला कोणी सोडून जातं का? अनिल देशमुख यांची भावनिक साद
गडचिरोली : रात्रीचा दिवस करून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यासह परराज्यातही विस्तार केला. अनेकांना मंत्री केले, मानसन्मान दिला, सरकारमध्ये काम करण्याची संधी दिली. पण, तेच आज सोडून गेले. ८३ वर्षांच्या बापाला कोणी सोडून जातं का, असा सवाल करून माजी मंत्री व आमदार अनिल देशमुख यांनी भावनिक साद घातली.
येथील चंद्रपूर रोडवरील एका मंगल कार्यालयात १२ जुलै रोजी अनिल देशमुख यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी जिल्ह्याचे निरीक्षक राजेंद्र वैद्य, मुनाफ पठाण, चामोर्शी बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार, माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय गोरडवार, जिल्हा सरचिटणीस श्याम धाईत, जगन्नाथ बोरकुटे, सुरेश नैताम, राजाभाऊ आत्राम, ॲड. संजय ठाकरे, सुरेश परसोडे आदी उपस्थित हाेते.
यावेळी अनिल देशमुख यांनी भाजपवर चौफेर टीका केली. ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा धाक दाखवून भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून तमाशा केल्याचा टोला त्यांनी लगावला. काल पक्षासोबत आलेल्यांना लगेचच मंत्रिपद दिले जात आहे, अनेकांना मंत्रिपदाची आश्वासने दिली, पण अजून खातेवाटप नाही. त्यामुळे भाजपमधील आमदार नाराज आहेत, तेच आता येणाऱ्या निवडणुकांत त्यांना हात दाखवतील. ५० खोेके देऊन सोबत गेलेल्या ४० पैकी पाचही आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. मुंबईच्या निलंबित पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांना उचकावून भाजपने मला गुन्ह्यात गोवले. १४ महिने कारागृहात राहावे लागले. मात्र, नंतर सत्य समोर आले, असे म्हणत त्यांनी आपबिती कथन केली. निरीक्षक राजेंद्र वैद्य, माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांनी मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष विजय गोरडवार यांनी प्रास्ताविक केले.
वय झालं म्हणणाऱ्यांबद्दल चीड
शरद पवार यांचं वय झालं. त्यांनी घरात बसून आशीर्वाद द्यावा, असे म्हणणाऱ्यांविरुद्ध लोकांमध्ये राग व चीड आहे, अशा शब्दांत अनिल देशमुख यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. मलाही अजित पवार यांनी संपर्क केला होता; पण मी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय ठामपणे घेतला.
आजही फुटलेले काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला.
गेले ते जाऊ द्या, २५ पट पक्ष वाढवा
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या काळात पक्षातील अनेक जुने पदाधिकारी, कार्यकर्ते दुरावले होते. आता तेच सोडून गेले, त्यामुळे पाेकळी भरुन काढण्याची संधी आहे. गेले ते जाऊ द्या, आता ३५ पट पक्ष वाढवा, असे आवाहन अनिल देशमुख यांनी केले.
कार्यकर्ते पाच तास ताटकळले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता बैठक दुपारी ३ वाजता होणार होती. त्यासाठी दुपारी २ वाजेपासूनच कार्यकर्ते आले होते. मात्र, अनिल देशमुख सायंकाळी ७ वाजता आले. वाटेत मालवाहू वाहनाचा अपघात झाला होता, त्यामुळे विलंब झाल्याचा खुलासा अनिल देशमुख यांनी केला.
..म्हणून राष्ट्रवादी पुन्हा
यापूर्वी काँग्रेसमध्ये होतो, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो; पण तेथे काहींनी बाजूला सारले त्यामुळे पक्ष सोडावा लागला, असे सांगून अतुल गण्यारपवार यांनी अप्रत्यक्षपणे धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर टीका केली. ९ वर्षांपासून अपक्ष होतो, पण संधी मिळत नव्हती. आता पडत्या काळात बोलावणे आले, ते सन्मानाने स्वीकारले. पुन्हा राष्ट्रवादीची बांधणी करू व येणाऱ्या सर्व निवडणुकांत यश मिळवू, अशी ग्वाही अतुल गण्यारपवार यांनी यावेळी दिली.