...तर लोह प्रकल्पात 20 हजार कोटी गुंतवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 05:00 AM2022-04-14T05:00:00+5:302022-04-14T05:00:24+5:30
सूरजागड पहाडावर झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध नागरिकांना रोजगार प्रमाणपत्रांचे वाटप, तसेच एटापल्ली आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय वसतिगृहांचे लोकार्पण तथा एटापल्ली तालुक्यातील वनहक्क पट्ट्यांचे वितरण नागरिकांना करण्यात आले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : सूरजागड लोहखाणीवर आधारित कोनसरी येथील लोह प्रकल्पाचे विस्तारीकरण करून हा प्रकल्प २० हजार कोटींवर नेण्याची आपली इच्छा आहे. त्यासाठी पुरेशी जागा आणि मालवाहतुकीसाठी लोहमार्ग उपलब्ध करून द्या, अशी अपेक्षा त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण यांनी बुधवारी (दि.१३) सुरजागड येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. त्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा उपलब्ध करून देण्यासोबतच रेल्वेमार्गासाठीही पुढाकार घेण्याची ग्वाही दिली.
सूरजागड पहाडावर झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध नागरिकांना रोजगार प्रमाणपत्रांचे वाटप, तसेच एटापल्ली आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय वसतिगृहांचे लोकार्पण तथा एटापल्ली तालुक्यातील वनहक्क पट्ट्यांचे वितरण नागरिकांना करण्यात आले.
यावेळी बोलताना आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी गोंडी भाषेतून भाषण दिले. एटापल्लीत पुरेशी जागा नसल्यामुळे लोह प्रकल्प कोनसरी येथे होत असला तरी एटापल्ली तालुक्यात जास्तीत जास्त विकासाची कामे करा, रेल्वेमार्ग आणा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. सुरुवातीला जिल्हाधिकारी संजय मीना यांनी सुरजागड लोह प्रकल्पामुळे सध्या १७८१ लोकांना थेट रोजगार सुरू झाल्याचे सांगून कोनसरीतील प्रकल्पानंतर रोजगार निर्मिती वाढेल, असे सांगितले. कार्यक्रमाला बहुतांश गावांचे नागरिक हजर हाेते.
नक्षली हिंसेत बळी गेलेल्यांचे स्मरण ठेवा
- यावेळी डीआयजी संदीप पाटील यांनीही जोषपूर्ण भाषणात नक्षल्यांच्या हिंसेने बळी गेलेल्या या जिल्ह्यातील नागरिकांचे स्मरण ठेवा. त्यांच्या दहशतीला भीक घालू नका, असे आवाहन नागरिकांना केले. सुरजागड प्रकल्प आर्थिक प्रगतीची गंगा या भागात आणणारा असून त्याचे श्रेय राज्य शासन व पालकमंत्र्यांना असल्याचे सांगितले.
जानेवारीपर्यंत लोहनिर्मितीला सुरुवात
- यावेळी बोलताना त्रिवेणी कंपनीचे एमडी बी.प्रभाकरण अवघ्या ६ महिन्यांत कंपनीने बरीच कामे करून दाखविली असून जानेवारी २०२३ मध्ये कोनसरीतील प्रकल्पात लोहनिर्मितीला प्रत्यक्षात सुरुवात होईल, असा विश्वास व्यक्त केला. कंपनीकडून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जात आहे. आलापल्ली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी जागा देण्याची मागणीही त्यांनी केली.
कौशल्य विकास प्रकल्प
यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाटा कन्सलटन्सीकडून १७५ कोटी आणि राज्य शासनाच्या ३० कोटी गुंतवणुकीतून गडचिरोलीत कौशल्य विकास प्रकल्प सुरू करणार असून त्यातून दरवर्षी ५ हजार युवक-युवती प्रशिक्षित होतील, अशी माहिती यावेळी बोलताना दिली. या प्रकल्पामुळे बेराेजगारांना जिल्ह्यातच नाही तर जिल्ह्याबाहेरही राेजगाराची संधी मिळणार आहे.
प्रथमच सूरजागडचे दर्शन
जंगलाच्या कुशीतील सुरजागड पहाड आणि लाेहखाण या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांनी पहिल्यांदाच पाहिले. पालकमंत्री येणार असल्याने शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी हजर हाेते. त्यात प्रामुख्याने गडचिराेलीचे जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, अहेरीचे जिल्हाप्रमुख रियाज शेख, जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार, विलास काेडाप, रामकिरीत यादव, अश्विनी यादव हजर हाेते.