राज्यातील ४२१ विद्यार्थी येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:49 AM2019-01-19T00:49:59+5:302019-01-19T00:52:21+5:30
राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत २९ ते ३१ डिसेंबरदरम्यान आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय क्रीडा संमेलन गडचिरोलीत आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नागपूर विभागाअंतर्गत येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर खेळाडू विद्यार्थ्यांसाठी २१ जानेवारीपासून सराव शिबिर घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत २९ ते ३१ डिसेंबरदरम्यान आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय क्रीडा संमेलन गडचिरोलीत आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नागपूर विभागाअंतर्गत येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर खेळाडू विद्यार्थ्यांसाठी २१ जानेवारीपासून सराव शिबिर घेण्यात येणार आहे. या सराव शिबिरात नागपूर विभागाच्या आठ प्रकल्पातून ४२१ खेळाडू विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
गडचिरोलीत होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातून चार विभागाचे सुमारे १ हजार ८०० विद्यार्थी आपले क्रीडा कौशल्य दाखविणार आहेत. त्याअनुषंगाने नागपूर अपर आयुक्त व गडचिरोली प्रकल्प कार्यालयाच्या वतीने या संमेलनाची तयारी सुरू आहे. भोजन, निवास, आरोग्य, क्रीडा संयोजन, प्रसिद्धी आदी समित्या स्थापन करण्यात आल्या असून या समित्यांमध्ये प्रकल्प कार्यालयाचे कर्मचारी व आश्रमशाळा शिक्षकांचा समावेश आहे. भोजन पुरवठा निवास व इतर बाबींची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून येत्या दोन दिवसांत पुरवठादार निश्चित होणार आहेत.
२१ जानेवारीपर्यंत गडचिरोली येथे होणाºया सराव शिबिरासाठी ६५ जणांची चमू जिल्हा प्रेक्षागार मैदानावर दाखल होणार आहे. यामध्ये आश्रमशाळांचे क्रीडा शिक्षक व क्रीडा मार्गदर्शकांचा समावेश राहणार आहे. सदर सराव शिबिरात नागपूर विभागातील गडचिरोली, अहेरी, भामरागड, चिमूर, भंडारा, देवरी, नागपूर व चंद्रपूर या आठ प्रकल्पातील जवळपास ४२१ खेळाडू विद्यार्थी कबड्डी, खो-खो आदीसह विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकाराचा सराव करणार आहेत. सदर सराव शिबिर २८ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे व सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली होणारा या सराव शिबिरासाठी जिल्हा प्रेक्षागार मैदानावर विविध खेळाच्या खेळपट्टीची आखणी येत्या दोन दिवसांत करण्यात येणार आहे.
पहिल्यांदाच गडचिरोली शहरात आश्रमशाळांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होणार आहेत. हे सर्व आयोजन नियोजनबद्धरित्या होण्यासाठी खासगी संस्थेला कंत्राट दिला जाणार आहे. ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. ती लवकर पूर्ण करण्याचे आव्हान आयोजकांसमोर आहे.
२२ ला समित्यांच्या सदस्यांची बैठक
या संमेलनाच्या नियोजनासाठी विविध समित्यांच्या सदस्यांची बैठक गडचिरोली येथील सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाच्या सभागृहात २२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला नागपूर विभागाच्या आठ प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी व अपर आयुक्त कार्यालयाच्या कर्मचारी उपस्थितीत राहणार आहेत. विविध समित्यांमधील नियुक्त झालेले आश्रमशाळांचे जवळपास ३०० शिक्षक व प्रकल्प कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.