कोर्ला परिसरात सुविधाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:24 AM2021-06-27T04:24:18+5:302021-06-27T04:24:18+5:30
सिरोंचा : तालुक्यातील कोर्ला गाव विकासापासून कोसो दूर आहे. या गावात अद्यापही मूलभूत सोयी-सुविधा पोहोचल्या नाही. येथील नागरिक अद्यापही ...
सिरोंचा : तालुक्यातील कोर्ला गाव विकासापासून कोसो दूर आहे. या गावात अद्यापही मूलभूत सोयी-सुविधा पोहोचल्या नाही. येथील नागरिक अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन गावाचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
राेजगारासाठी युवकांना कर्ज मिळेना
अहेरी : बेरोजगार युवक उद्योग सुरू करण्याच्या उद्देशाने कर्ज घेण्यासाठी बँकेच्या चकरा मारत आहेत. मात्र, त्यांच्याकडे तारण नसल्याचे कारण पुढे करीत बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात.
महागावजवळ पूल बांधण्याची मागणी
महागाव बु. : अहेरी तालुका मुख्यालयापासून सहा किमी अंतरावरील महागावजवळ नाल्यावर ठेंगणा पूल आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात या पुलावर पाणी चढून दोन ते तीन दिवस वाहतूक ठप्प होत असते. त्यामुळे उंच पूल बांधावे.
वैरागड परिसरातील अनेक रस्ते अरुंदच
वैरागड : रस्त्याच्या दुतर्फा अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर कुंपण केल्याने रस्त्याच्या कडा दिसेनाशा झाल्या आहेत. विरुद्ध दिशेने येणारे वाहन ओलांडताना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करावे.
पथदिवे नियमित सुरू ठेवण्याची मागणी
गडचिरोली : शहराच्या मुख्य तसेच अंतर्गत मार्गावरील पथदिवे अनेकदा रात्रीच्या सुमारास बंद स्थितीत असतात. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पथदिवे नियमित सुरू ठेवावेत, अशी मागणी होत आहे.
कुंपणासाठी वाढली वृक्षतोड
आरमाेरी : शेतीच्या कुंपणासाठी झाडाच्या फांद्या तोडून त्याचे खांब तयार केले जातात. कुंपणासाठी शेतकरी दरवर्षी शेकडो वृक्षांची तोड करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानावर लोखंडी खांब उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. तरीसुद्धा शासन कुंपणासाठी याेजना राबवित नाही.
दुसऱ्या राज्यात रोजगारासाठी भटकंती वाढली
देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग नसल्याने येथील बरेचशे सुशिक्षित युवक पुणे, नागपूर व इतर शहरांत कंपन्यांमध्ये कामासाठी जात असतात. मात्र, राजस्थान व इतर राज्यांतील बहुतांश कुटुंब दरवर्षी उन्हाळ्यात गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागांत येऊन मजुरी मिळवितात.
हालेवारात थ्रीजी सेवा नावापुरतीच
एटापल्ली : तालुक्यात मोठ्या संख्येने पोलीस, सीआरपीएफ, एसआरपीएफचे जवान आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहून तालुक्यात सेवा देत आहेत. त्यांना कुटुंबासोबत संवाद साधण्याचे एकमेव साधन मोबाईल असून, अनेक वेळा नेटवर्कमध्ये अडचणी येतात.
शासकीय जागेवर अतिक्रमण वाढला
भामरागड : तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात विविध ठिकाणच्या शासकीय जागेवर शेकडो नागरिकांचे अतिक्रमण असल्याचे दिसून येत आहे. अनेक धनाढ्य लोक प्लाॅट पाडून विक्रीचा धंदाही करीत आहेत. मात्र याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या मागण्यांची दखल प्रशासन घेत नाही.
चिरेपल्ली मार्गाला खडीकरणाची प्रतीक्षा
गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील खांदला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिरेपल्ली मार्गाचे मातीकाम १० वर्षांपूर्वी करण्यात आले. या मार्गाचे खडीकरण न झाल्याने रस्ता पूर्णत: खड्डेमय झाला आहे. पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे सध्या येथून आवागमन करणे कठीण होत आहे. मात्र दुरुस्तीकडे दुर्लक्ष आहे.
घाेट परिसरात शौचालयाचा गैरवापर वाढला
घाेट : परिसरातील अनेक गावांत गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने, शौचालयाचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे.
महा-ई-सेवा केंद्र अत्यल्प
भामरागड : जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्र तोकडे आहेत. परिणामी, महा-ई-सेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. महा-ई-सेवा केंद्रामुळे लोकांना घरबसल्या दाखले मिळणार असले, तरी ही सेवा इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर अवलंबून आहे.