२०२ जागांसाठी नामांकनच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:53 PM2018-02-18T23:53:56+5:302018-02-18T23:55:12+5:30
निवडणूक विभागाने १६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा व २०७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र पोटनिवडणूक असलेल्या २०७ ग्रामपंचायतीमधील ३८४ प्रभागांपैकी केवळ १८२ नामांकन वैध ठरले आहेत.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : निवडणूक विभागाने १६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा व २०७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र पोटनिवडणूक असलेल्या २०७ ग्रामपंचायतीमधील ३८४ प्रभागांपैकी केवळ १८२ नामांकन वैध ठरले आहेत. यातील काही प्रभागात एक पेक्षा अधिक नामांकन आले आहेत. तर काहींनी नामांकन मागे घेतले आहे. त्यामुळे २०२ पेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागा रिक्त राहणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुरूवातीला ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत नामांकन भरायचे होते. मात्र या कालावधीत इंटरनेटची समस्या निर्माण झाल्याने अनेक उमेदवारांना नामांकन भरता आले नाही. परिणामी शासनाने दोन दिवस मुदत वाढवून १२ फेब्रुवारीपर्यंत केली. गडचिरोली जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यामध्ये एकूण ४९ प्रभाग आहेत. या जागांसाठी एकूण १६६ उमेदवारांनी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी नामांकन भरले होते. त्यापैकी तीन नामांकन अवैध ठरून १६३ नामांकन वैध ठरले. तर सरपंच पदासाठी ३५ नामांकनापैकी ३३ नामांकन वैध ठरले आहेत.
२०७ ग्रामपंचायतींमधील ३८४ प्रभागांमध्ये पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. यासाठी १९३ नामांकन प्राप्त झाले होते. त्यापैकी १८२ नामांकन वैध ठरले. एका जागेस एक नामांकन असे गृहित धरले तरी उपलब्ध जागांच्या तुलनेत सुमारे २०२ नामांकन कमी आहेत. याचा अर्थ कमीतकमी २०२ ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागा रिक्त राहणार आहेत. काही प्रभागांमध्ये एकापेक्षा अधिक उमेदवारांनी नामांकन भरले आहेत. तर काहींनी मागे घेतले आहेत. त्यामुळे २०२ पेक्षा अधिक जागा रिक्त राहणार आहेत. या ठिकाणी पुन्हा सहा महिन्यांनी निवडणूक घ्यावी लागणार आहे.
दुर्गम भागातील नागरिकांची निवडणुकीकडे पाठ
पोटनिवडणूक जाहीर झालेल्या बहुतांश ग्रामपंचायती धानोरा, अहेरी, भामरागड, सिरोंचा या तालुक्यातील आहेत. नक्षल्यांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याने नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना ग्रामपंचायत सदस्य न बनण्याची धमकी देतात. त्यामुळे बहुतांश नागरिक इच्छा असूनही ग्रामपंचायतीचे नामांकन भरत नाही. काही गावांमध्ये ज्या प्रवर्गासाठी जागा आहे. त्या प्रवर्गाचे नागरिकच नाही. त्यामुळे सदर गावात त्या प्रवर्गाचा उमेदवार मिळत नाही. या सर्व कारणांमुळे ग्रामपंचायतीच्या जागा रिक्त राहतात. प्रशासनाला या ग्रामपंचायतीमध्ये वेळोवेळी निवडणूक घेण्याची नामुश्की ओढवते. यावेळी सुध्दा २०० पेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागा रिक्त राहणार असल्याने पुन्हा सहा महिन्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे.
सरपंचपदासाठी चांगला प्रतिसाद
१६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १६ सरपंचाच्या जागा आहेत. यासाठी एकूण ३३ नामांकन सादर झाले आहेत. कोरची तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी १२ नामांकन, धानोरा तालुक्यातील चार ग्रामपंचायतीमध्ये सात नामांकन, गडचिरोली तालुक्यातील एक सरपंच पदासाठी दोन नामांकन, एटापल्ली तालुक्यातील एका पदासाठी पाच नामांकन, भामरागड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी एकच नामांकन, अहेरी व कोरची तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी तीन नामांकन प्राप्त झाले आहेत.
जात वैधता प्रमाणपत्राची अडचण
ग्रामपंचायतीची निवडणूक लढण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्राचा अर्ज तालुकास्तरावरून करावा लागतो, यासाठी अनेक दाखले जोडावे लागतात. तालुकास्थळाचे गावापासून अंतर ८० ते १०० किमी आहे. एवढ्या दूर अंतरावर जाऊन दाखले गोळा करणे शक्य होत नाही. त्यामुळे बहुतांश नागरिक जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र काढत नाही. जात वैधता प्रमाणपत्रच राहत नसल्याने बहुतांश नागरिक इच्छा असूनही ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अर्ज करू शकत नाही.