चामोर्शी तालुक्यातील विद्यार्थी आहेत पाठ्यपुस्तकांविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:40 AM2021-08-24T04:40:42+5:302021-08-24T04:40:42+5:30
यंदा शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत पुस्तकांचे अजूनपर्यंत मोफत वाटप न केल्यामुळे मागील वर्षीच्या मुलाकडून सुस्थितीत असलेल्या पुस्तकांचे ...
यंदा शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत पुस्तकांचे अजूनपर्यंत मोफत वाटप न केल्यामुळे मागील वर्षीच्या मुलाकडून सुस्थितीत असलेल्या पुस्तकांचे योग्य संकलन करून ती पुस्तके विद्यार्थ्यांना देत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शिक्षक वर्गशाळा सुरू झाल्यानंतर गावागावात जाऊन विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे काम केलेले होते. काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी अधिक असल्यामुळे तेवढ्याच पटीत पुस्तके उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके मिळण्यास विलंब होत आहे. बहुतांश शाळांनी इयत्ता पाचवी व सातवीचे ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले आहेत. पण विद्यार्थ्यांच्या हातात परिपूर्ण पुस्तके नसल्याने त्यांच्या अभ्यासात खोळंबा होऊन त्यांचा हिरमोड होत आहे. इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी अभ्यास सोडून इतर कामाकडे जास्त लक्ष देत असल्याचा आरोप पालकांनी शिक्षण विभागावर केला आहे. इयत्ता आठवीचे प्रत्यक्ष वर्ग शाळेत सुरू होऊन जवळपास दीड महिना होत आहे. विद्यार्थ्याकडे परिपूर्ण पुस्तकांचा संच अजूनपर्यंत मिळाला नसल्याने विद्यार्थी शाळेमध्ये रोज येत नसल्याचे दिसून येत आहे. काही शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू झालेले आहेत पण त्या शाळेतील शिक्षकांनाही शिकविताना अडचणी निर्माण होत आहेत.
शिक्षण विभागाने गतवर्षी पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचे ठरविले आहे. यावर्षी ८० टक्के पुस्तकांची निर्मिती करून प्रत्येक विद्यार्थ्याना ही पुस्तके मिळतील असे शिक्षण विभागाने सांगितले होते. या उपक्रमातून कागदाची बचत होऊन झाडांचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे असेही सांगितले होते. चामोर्शी गटसाधन केंद्राला पुस्तके आली असूनही अजूनपर्यंत वाटप केले नसल्याने शिक्षण विभाग किती जागरूक आहे हे दिसून येत आहे.
२०१९-२० किंवा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जुनी वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेत जमा करावीत, असे आवाहन शाळांनी पालक आणि विद्यार्थ्यांना केले होते. त्यामुळे जवळपास संपूर्ण विद्यार्थ्यांनी जुनी पुस्तके शाळेला परत केलेली आहेत. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनीच घरोघरी फिरून पुस्तकांचे संकलन करण्याची मोहीम हाती घेऊन अनेक नवीन विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करण्याचे काम पूर्ण केले. पण नवीन पुस्तके अजूनपर्यंत विद्यार्थ्याच्या हातात पोहोचली नसल्याने विद्यार्थ्याचा हिरमोड होत आहे. त्यामुळे या पुस्तकाचे वितरण लवकरात लवकर करावे, अशी मागणी विद्यार्थी, पालक व शिक्षक करीत आहेत.
काेट :
या महिन्याच्या दोन ते तीन तारखेला चामोर्शी गटसाधन केंद्रात तालुक्यात जेवढे केंद्र आहेत त्या सर्व केंद्रांकरिता पुस्तके आलेली आहेत. त्या सर्व पुस्तकांचे गट साधन केंद्राने केंद्रनिहाय, विषयनिहाय संकलन केले असून या पुस्तकांचे गठ्ठे बांधून तयार आहेत. या संकलन प्रक्रियेला तीन ते चार दिवस लागले. पण ज्या पुरवठादाराने या पुस्तकाचा पुरवठा केलेला आहे. सर्व केंद्रामध्ये पुस्तके पोहोच करण्याची त्या पुरवठादाराची जबाबदारी आहे. पण अजूनपर्यंत तो पुरवठादार पुस्तके पोहोच करण्यासाठी आलेला नाही. म्हणून विद्यार्थ्यांना पुस्तके मिळण्यासाठी विलंब होतं आहे. त्यामुळे दहा ते पंधरा दिवसांपासून पुस्तके अशीच पडून आहेत.
पंचफुलीवार, केंद्रप्रमुख, भेंडाळा