मामाच्या घरी शंभर गायी; पण सकाळी चहासाठीही दूध मिळत नाही !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 04:45 PM2024-05-14T16:45:58+5:302024-05-14T16:46:43+5:30
आरमोरी तालुक्यात ठाणेगावात एकमेव डेअरी: सहकारी संस्था निघाल्या अवसायनात
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : ऐतिहासिक स्थळे व १०३ लहान-मोठ्या गावांचा समावेश असलेल्या आरमोरी तालुक्यात पशुपालक व जनावरांची संख्या लक्षणीय आहे; पण दुधाळ जनावरांची संख्या फार कमी असल्याने बाहेरच्याच दुधावर नागरिकांना अवलंबून राहावे लागते. याशिवाय ज्या शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे आहेत. त्यांना दूध विक्रीसाठी डेअरी किंवा ग्राहक मिळत नाही. पर्यायाने भाव कमी मिळतो. आरमोरी तालुक्यातील ठाणेगावात एकमेव दूध डेअरी असल्याने दूध उत्पादन व विक्रीला वाव नाही. 'मामाच्या घरी शंभर गायी; पण सकाळी चहासाठी दूध नाही!' अशी स्थिती सध्या वैरागड, ठाणेगाव परिसरात दिसून येत आहे.
आरमोरी तालुक्यात वैरागड, ठाणेगाव या दोन गावांत सहकारी दुग्ध संकलन केंद्र होते. वैरागड येथे जय किसान दुग्ध सहकारी संस्था या नावाने नोंदणीकृत दूध डेअरी होती. ही संस्था चांगली आर्थिक भरभराटीला आली होती. संस्थेला स्वमालकीची जागादेखील आहे. वैरागड येथील दूध संकलन केंद्रावर परिसरातील सुकाळा, मोहारी, वडेगाव, डोंगरतमाशी, मेंढेबोडी, नागरवाही, देलनवाडी येथील पशुपालक दूध विक्रीसाठी आणत असत; पण कालांतराने वैरागड येथील सहकारी दुग्ध संस्था अवसायनात निघाली तेव्हापासून वैरागड येथे नवीन दुसरे दूध संकलन केंद्र सुरू झाले नाही. आता अपेक्षित भाव मिळत नाही. पर्यायाने दूध उत्पादन घटले आहे. ठाणेगाव येथील दूध संकलन केंद्रावर डोंगरगाव, वासाळा, चुरमुरा, चामोर्शी, वनखी, चामोर्शी माल, कनेरी रामाळा आदी गावातील दूध उत्पादक शेतकरी दूध विक्रीसाठी आणतात. संस्थेची सभासद संख्या ५८१ आहे.
दुधाळ जनावरे वाटपाचा आकडा बनावट?
• शासनाच्या विविध योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचे सवलतीत वाटप केले जाते. तशी आकडेमोड संबंधित अधिकाऱ्यांकडून दाखवली जाते; पण हा आकडा बनावट असतो.
• नव्यांच्या जागी जुनी जनावरे दाखवून अनुदान लाटले जाते. यामुळे दुधाळ जनावराची संख्या जिल्ह्यात वाढलेली नाही. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करणे गरजेचे आहे. पशुसंवर्धन विभागाचे अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
दुधाळ जनावरांना जी खुराक द्यावी लागते तेवढा पैसा दुग्ध उत्पादकांना मिळत नाही. घरोघरी जाऊन कमी दरात दूध विक्री करावी लागते. त्यामुळे वैरागड येथे दूध संकलन केंद्र सुरू करावे.
- राजेश बावनकर, शेतकरी, वैरागड
आरमोरी तालुक्यात ठाणेगाव येथे १९८३ मध्ये जय लक्ष्मी दूध उत्पादक सहकारी संस्था स्थापन झाली. आर्थिक लाभामुळे ही संस्था आर्थिक भरभराटीस आली. ही संस्था आजही चांगल्या प्रकारे सुरू आहे.
- गजानन नंदरधने, सचिव, जयलक्ष्मी दूध उत्पादक सहकारी संस्था