झिमेलावासीयांच्या यातना थांबता थांबेना, पर्यायी मार्ग नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 05:00 AM2021-07-18T05:00:00+5:302021-07-18T05:00:26+5:30
झिमेलाजवळच्या नाल्यावर पुलाची नितांत गरज असल्याच्या मुद्द्याकडे सर्वप्रथम ‘लोकमत’ने लक्ष वेधून लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी झिमेला पोचमार्गाच्या रस्त्याची पाहणी केली आणि त्या ठिकाणी पूल उभारणीला मंजुरी दिली. काही दिवसांतच पुलाचे बांधकामसुद्धा सुरू करण्यात आले. मात्र, कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे हे काम संथगतीने सुरू आहे.
उमेश पेंड्याला
लाेकमत न्यूज नेटवर्क
गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील तिमराम ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या झिमेला गावाजवळील पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे गावकऱ्यांना यावर्षीही तालुकास्थळी जाण्यासाठी नाल्याच्या पाण्यातून वाट काढण्याची कसरत करावी लागत आहे. दुसरा कोणताही पर्यायी मार्ग नसल्यामुळे झिमेलावासीयांच्या यातना सुरूच आहेत.
झिमेलाजवळच्या नाल्यावर पुलाची नितांत गरज असल्याच्या मुद्द्याकडे सर्वप्रथम ‘लोकमत’ने लक्ष वेधून लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी झिमेला पोचमार्गाच्या रस्त्याची पाहणी केली आणि त्या ठिकाणी पूल उभारणीला मंजुरी दिली. काही दिवसांतच पुलाचे बांधकामसुद्धा सुरू करण्यात आले. मात्र, कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे हे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे या पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची आशा मावळली आहे.
आता पावसाळा सुरू झाल्यापासून झिमेलावासीयांना त्या नाल्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुलाचे किंवा रपट्याचे बांधकाम करताना नियमानुसार ठेकेदाराकडून नागरिकांच्या रहदारीसाठी अडचण होऊ नये, यासाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करून देणे आवश्यक असते, मात्र ठेकेदाराने अशी कोणतीच व्यवस्था केली नाही. उन्हाळ्यात नाल्यात पाणी नसल्याने खोदकाम केलेल्या मातीवरून लोक येणे-जाणे करत होते, मात्र पावसाच्या पाण्याने सदर पुलाजवळ टाकून ठेवलेली माती पूर्णतः पाण्याने वाहून गेली. आता नाल्याच्या पाण्यातून जीव मुठीत धरून आणि कसरत करत पैलतीर गाठावे लागत आहे.
अशा आहेत अडचणी
झिमेला हे गाव आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरून उत्तर दिशेला तीन ते चार किलोमीटर अंतरावर गाव आहे. त्या गावची लोकसंख्या सुमारे पाचशे ते सहाशे एवढी आहे. त्या गावात जिल्हा परिषद शाळासुद्धा आहे. गावात आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना तालुकास्थळी धाव घ्यावी लागते. आरोग्य उपकेंद्र मोसम येथे असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना झिमेला गावात सेवा देण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करून नागरिकांना सुविधा देण्याचा प्रयत्न व्हावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
अनेक गावांचे मार्ग हाेत आहेत बंद
जिल्ह्यात २०० पेक्षा अधिक मार्गांवर नाले आहेत. पावसाळ्याला सुरूवात हाेताच ते नाले वाहू लागतात. त्यामुळे हे मार्ग वाहतुकीसाठी बंद हाेतात. काही नागरिक वाहत्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रयत्नात आतापर्यंत अनेक जणांना जलसमाधी मिळाली आहे.