७३६ ग्रामसभांचे लिलावच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:56 AM2018-05-19T00:56:32+5:302018-05-19T00:56:32+5:30
यावर्षी जिल्हाभरातील १ हजार १७१ ग्रामसभांनी स्वत: तेंदूपत्ता संकलन करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यापैकी केवळ ४३५ ग्रामसभांमधील तेंदूपत्त्याचे लिलाव झाले आहेत. सुमारे ७३६ ग्रामसभांच्या तेंदूपत्त्याकडे कंत्राटदारांनी पाठ फिरविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : यावर्षी जिल्हाभरातील १ हजार १७१ ग्रामसभांनी स्वत: तेंदूपत्ता संकलन करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यापैकी केवळ ४३५ ग्रामसभांमधील तेंदूपत्त्याचे लिलाव झाले आहेत. सुमारे ७३६ ग्रामसभांच्या तेंदूपत्त्याकडे कंत्राटदारांनी पाठ फिरविली आहे. लिलावच न झाल्याने तेंदूपत्ता संकलन अडचणीत आले असून यामुळे ग्रामसभांना कोट्यवधी रूपयांच्या रॉयल्टीवर पाणी सोडावे लागणार आहे. त्याबरोबर तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांचा रोजगारही हिरावला जाण्याची शक्यता आहे.
पेसा कायद्यांतर्गत ग्रामसभांना त्यांच्या हद्दीतील जंगलातून तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार शासनाने बहाल केले आहेत. यानुसार मागील तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभा तेंदूपत्ता संकलन करीत आहेत. मागील वर्षी तेंदूपत्त्याला चांगला भाव मिळाला होता. तेंदूपत्त्याचा भाव सुमारे २४ हजार रूपये प्रती स्टँडर्ड बॅग (एक हजार पुडा)पर्यंत पोहोचला. यावर्षी मात्र तेंदूपत्ता बाजारात प्रचंड मंदी आहे. मागील वर्षी काही व्यापाऱ्यांना तोट्याचा सामना करावा लागला. त्यामुळे यावर्षी व्यापाºयांनी तेंदूपत्ता लिलावाकडे पाठ फिरविली आहे. पहिल्या व दुसऱ्या लिलावच्या फेरीत तर व्यापाऱ्यांनी सहभागच घेतला नाही. तीसऱ्या लिलावात कंत्राटदांनी सहभागी होऊन बोली लावली. मात्र अत्यंत कमी भाव मिळाला. ज्या ग्रामसभांचा लिलाव झाला त्यांना केवळ दोन ते चार हजार रूपये प्रती स्टँडर्ड बॅग भाव मिळाला. या भावाबाबत ग्रामस्थ नाराज असले तरी दुसरा पर्याय नसल्याने मिळेल त्या भावाला तेंदूपत्ता विकावा लागला.
ज्या गावांमध्ये तेंदूपत्ता लिलाव झाले आहेत. त्या गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाला मागील आठ दिवसांपासून सुरूवात झाली आहे. तर काही ठिकाणचे तेंदूपत्ता संकलन आटोपतही आले आहे. मात्र सुमारे ७३६ ग्रामसभांच्या तेंदूपत्त्याचे लिलाच झाले नाही. त्यामुळे या ठिकाणी तेंदूपत्ता संकलनाला सुरूवातच झाली नाही. पुढील आठ दिवसांत रोहिणी नक्षत्राला सुरूवात होणार आहे. तेंदूपत्ता संकलन झाल्यानंतर तो किमान आठ दिवसांत वाळवावा लागतो. पाऊस सुरू झाल्यास तेंदूपत्ता वाळणार नाही. त्यामुळे आठ दिवसानंतर तेंदूपत्ता संकलन करण्याची जोखीम कंत्राटदार उचलणार नाही. परिणामी या ठिकाणचे तेंदूपत्ता संकलन अडचणित येण्याची शक्यता आहे. तेंदूपत्त्याचे संकलन न झाल्यास कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडणार आहे.
एटापल्ली तालुक्यात संकलन होणार नाही
एटापल्ली तालुक्यातील काही ग्रामसभांच्या तेंदूपत्ता संकलनाचे लिलाव झाले. मात्र काही ग्रामसभांचे लिलावच झाले नाही. ज्या ग्रामसभांचे लिलाव झालेत आहेत. त्यांना मागील वर्षीच्या तुलनेत २५ टक्केही भाव मिळाला नाही. त्यामुळे दरवर्षी अशीच सवय कंत्राटदारांना लागून पुढील वर्षी सुध्दा तेंदूपत्त्याचे भाव पडण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन एटापल्ली तालुक्यातील सर्व ग्रामसभांनी यावर्षी तेंदूपत्ता संकलनच न करण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त घोटसूर ही एकच ग्रामसभा संकलन करणार आहे, अशी माहिती ग्रामसभेच्या पदाधिकाºयांनी दिली आहे. एटापल्ली तालुक्यातील तेंदूपत्त्याचा दर्जा चांगला असल्याने कंत्राटदारांनी ६३ ग्रामसभांच्या लिलावात सहभाग घेऊन तेंदूपत्ता खरेदी केला होता.
काही ग्रामसभांचे तेंदूपत्ता संकलन आटोपण्याच्या मार्गावर
काही ग्रामसभांची लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लिलावांची संख्या वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र पावसाळ्याला सुरूवात होणार असल्याने तेंदूपत्ता संकलन करणे शक्य होणार नाही. कंत्राटदार तेंदूपत्ता संकलन करण्याची जोखीम उचलणार नाही. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन होणार काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.
हजारोंचा रोजगार हिरावला
तेंदूपत्ता संकलन हा जिल्ह्यातील सर्वात मोठा रोजगार पुरविणार व्यवसाय आहे. जिल्ह्यातील मजुरांबरोबरच सीमेलगतच्या छत्तीगड, तेलंगणा राज्य व चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील हजारो मजुरांना तेंदूपत्ता व्यवसाय रोजगार पुरवित होता. केवळ दहा दिवसांच्या या व्यवसायात एक तेंदूपत्ता मजूर पाच ते दहा हजार रूपयांपर्यंतची मजुरी कमावित होता. हा पैसा खरिप हंगामातील पिकांच्या खर्चासाठी वापरता येत असल्याने सावकाराच्या दारात उभे राहावे लागत नव्हते. आता मात्र हा रोजगारच हिरावला असल्याने मजूर अडचणीत आले आहेत.