डुकरांच्या नासाडीची नुकसानभरपाई नाही
By Admin | Published: September 9, 2016 01:06 AM2016-09-09T01:06:05+5:302016-09-09T01:06:05+5:30
येथील गावालगत असलेल्या ऐतिहासिक किल्ला सध्या झाडाझुडुपांनी वेढलेला आहे आणि किल्ला परिसरातील दाट झाडीत रानडुकरांचे कळप वास्तव्याला असतात.
गतवर्षीचे प्रस्ताव पडूनच : वैरागड किल्ल्यात कळप वास्तव्याला, पिकांची प्रचंड हानी
वैरागड : येथील गावालगत असलेल्या ऐतिहासिक किल्ला सध्या झाडाझुडुपांनी वेढलेला आहे आणि किल्ला परिसरातील दाट झाडीत रानडुकरांचे कळप वास्तव्याला असतात. दिवसभर किल्ल्यात आश्रयाला असलेले रानडुकरे रात्री किल्ल्यालगत असलेल्या शेतातील खरीपाच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करतात. परंतु याकडे वनविभागाचे दुर्लक्ष असून सन २०१५ मध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाईही अद्याप करण्यात आलेली नाही, अशी माहिती मिळाली आहे.
सध्या खरीपाचे धान व तूर पीक ऐन बहरात आले आहे. त्या पिकांची नासाडी सध्या चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाला असून वन विभागाने रानडुकराच्या बंदोबस्तासाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. मागील वर्षी आॅक्टोबर २०१५ मध्ये रानडुकरांमुळे झालेल्या धानाची नुकसानभरपाई मिळालेली नाही. म्हणून वन विभागाकडे रितसर अर्ज करण्यात आला. मात्र संबंधित शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. याबाबत वनपाल, वनरक्षक यांना विचारणा केली असता, अर्जात त्रूटी असल्याचे सांगितले. राज्याच्या वनमंत्र्यांनी जंगली श्वापदांकडून खरोखरच हानी झाली असेल तर त्या संबंधित शेतकऱ्यांना १७ दिवसांत नुकसान भरपाई देण्यात यावी, असे आदेश वन विभागाला दिले आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत निष्काळजीपणा करीत असल्याची तक्रार उपवनसंरक्षक वडसा यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यानंतरही नुकसानभरपाई देण्याच्या कामाला वेग आला नाही. तक्रार केल्यानंतर वनकर्मचारी पंचनामा करण्यास सुद्धा संबंधित ठिकाणी जात नसल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. (वार्ताहर)
आठ महिन्यांत चारवेळा प्रस्ताव वापस
वन्य प्राण्यांकडून जी हानी होते, त्या तोकड्या मदतीसाठी लांब प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यातही वन विभागाच्या चुकीच्या माहितीमुळे वैरागड येथील एका शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव आठ महिन्यात चारवेळा परत आला.