कोर्लात सुविधाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:48 AM2021-06-16T04:48:00+5:302021-06-16T04:48:00+5:30

युवकांना कर्ज मिळेना अहेरी : बेरोजगार युवक उद्योग सुरू करण्याच्या उद्देशाने कर्ज घेण्यासाठी बँकेच्या चकरा मारत आहेत. मात्र, त्यांच्याकडे ...

There is no facility in Korla | कोर्लात सुविधाच नाही

कोर्लात सुविधाच नाही

Next

युवकांना कर्ज मिळेना

अहेरी : बेरोजगार युवक उद्योग सुरू करण्याच्या उद्देशाने कर्ज घेण्यासाठी बँकेच्या चकरा मारत आहेत. मात्र, त्यांच्याकडे तारण नसल्याचे कारण पुढे करीत बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात.

महागावजवळ पूल बांधण्याची मागणी

महागाव बु. : अहेरी तालुका मुख्यालयापासून सहा किमी अंतरावरील महागावजवळ नाल्यावर ठेंगणा पूल आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात या पुलावर पाणी चढून दोन ते तीन दिवस वाहतूक ठप्प होत असते. त्यामुळे उंच पूल बांधावे.

वैरागड परिसरातील अनेक रस्ते अरुंदच

वैरागड : रस्त्याच्या दुतर्फा अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर कुंपण केल्याने रस्त्याच्या कडा दिसेनाशा झाल्या आहेत. विरुद्ध दिशेने येणारे वाहन ओलांडताना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करावे.

पथदिवे नियमित सुरू ठेवण्याची मागणी

गडचिरोली : शहराच्या मुख्य तसेच अंतर्गत मार्गावरील पथदिवे अनेकदा रात्रीच्या सुमारास बंद स्थितीत असतात. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पथदिवे नियमित सुरू ठेवावेत, अशी मागणी होत आहे.

रस्त्यांवरील खड्डे बुजवा

गडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. बांधकाम विभागाने याकडे वेळीच लक्ष घालून खड्डे बुजवावे, अशी मागणी आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष झाले आहे.

कुंपणासाठी वृक्षतोड

आरमाेरी : शेतीच्या कुंपणासाठी झाडाच्या फांद्या तोडून त्याचे खांब तयार केले जातात. कुंपणासाठी शेतकरी दरवर्षी शेकडो वृक्षांची तोड करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानावर लोखंडी खांब उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. तरी सुध्दा शासन कुंपणासाठी याेजना राबवित नाही.

रोजगारासाठी भटकंती

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग नसल्याने येथील बरेचशे सुशिक्षित युवक पुणे, नागपूर व इतर शहरांत कंपन्यांमध्ये कामासाठी जात असतात. मात्र, राजस्थान व इतर राज्यांतील बहुतांश कुटुंब दरवर्षी उन्हाळ्यात गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागांत येऊन मजुरी मिळवितात.

व्यावसायिक अडचणीत

आरमोरी : अद्ययावत तंत्रज्ञानामुळे अनेक लघु व्यवसाय आता शेवटच्या घटका मोजत आहेत. मोबाईलमुळे घड्याळ दुरुस्तीचे काम शिल्लकच राहिले नसल्याने दुरुस्तीचे काम करणाऱ्या कारागिरांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे विक्रेतेही चिंतेत सापडले आहेत.

हालेवारात थ्रीजी सेवा द्या

एटापल्ली : तालुक्यात मोठ्या संख्येने पोलीस, सीआरपीएफ, एसआरपीएफचे जवान आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहून तालुक्यात सेवा देत आहेत. त्यांना कुटुंबासोबत संवाद साधण्याचे एकमेव साधन मोबाईल असून, अनेकवेळा नेटवर्कमध्ये अडचणी येतात.

अर्जनविसांचा सुळसुळाट

गडचिरोली : जिल्ह्यात तालुक्यातील तहसील परिसरात अनेक परवानाधारक अर्जनवीस तहसीलचे विविध प्रकारचे फाॅर्म अशिक्षित नागरिकांना भरून देण्यासाठी बसतात. मात्र, काही विनापरवानाधारक अर्जनवीससुद्धा या कामात असल्याचे दिसून येते. विनापरवानाधारक अर्जनवीस फसवणूक करतात.

शासकीय जागेवर कब्जा

भामरागड : तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात विविध ठिकाणच्या शासकीय जागेवर शेकडो नागरिकांचे अतिक्रमण असल्याचे दिसून येत आहे. अनेक धनाढ्य लोक प्लाॅट पाडून विक्रीचा धंदाही करीत आहेत. मात्र याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या मागण्यांची दखल प्रशासन घेत नाही.

चिरेपल्ली मार्ग बकाल

गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील खांदला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिरेपल्ली मार्गाचे मातीकाम १० वर्षांपूर्वी करण्यात आले. या मार्गाचे खडीकरण न झाल्याने रस्ता पूर्णत: खड्डेमय झाला आहे. पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे सध्या येथून आवागमन करणे कठीण होत आहे. मात्र दुरूस्तीकडे दुर्लक्ष आहे.

पुलाला कठडे लावा

चामाेर्शी : जिल्ह्यात अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नाल्यांवर संरक्षण कठडे तुटले असून, काही चोरीलाही गेले आहे.

बेरोजगारांमध्ये नैराश्य

देसाईगंज : परिसरात मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगार असून, त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते नैराश्यात सापडले आहेत. त्यामुळे या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी परिसरात उद्योगाची निर्मिती करावी, अशी मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे. काेराेनामुळे वर्षभरापासून भरती प्रक्रिया नसल्याने बेराेजगार थकले आहेत.

शौचालयाचा गैरवापर

घाेट : परिसरातील अनेक गावांत गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने, शौचालयाचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे.

वीज खांबामुळे धोका

आरमाेरी : येथील अनेक वॉर्डांतील रस्त्यालगत असलेले वीज खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे खांब बदलण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे. महावितरणने जुने खांब बदलवून नवीन लावावे.

महा-ई-सेवा केंद्र अत्यल्प

भामरागड : जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्र तोकडे आहेत. परिणामी, महा-ई-सेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. महा-ई-सेवा केंद्रामुळे लोकांना घरबसल्या दाखले मिळणार असले, तरी ही सेवा इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर अवलंबून आहे.

Web Title: There is no facility in Korla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.