ठरलेल्या मेन्यूनुसार आहार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 11:39 PM2018-02-03T23:39:17+5:302018-02-03T23:39:27+5:30
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या खरपुंडी येथील जि.प. शाळेला विद्यार्थ्यांना व्हायरल फ्लूरची लागण झाल्याने उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या खरपुंडी येथील जि.प. शाळेला विद्यार्थ्यांना व्हायरल फ्लूरची लागण झाल्याने उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २६ जानेवारीला या विद्यार्थ्यांची सुटी करण्यात आली. या प्रकरणाची दखल घेत जि.प. सदस्य अॅड. राम मेश्राम यांनी खरपुंडी शाळेला भेट देऊन तेथील वस्तू स्थिती जाणून घेतली.
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शासनाने ठरविलेल्या मेन्यूनुसार विद्यार्थ्यांना आहार देणे आवश्यक आहे. मात्र खरपुंडी शाळेत मेन्यूनुसार आहार दिला जात नसून पुरवठ्याअभावी आहारामध्ये नियमितता राहत नाही, हे दिसून आले. शालेय पोषण आहार प्रत्येक महिन्याला शाळेत पोहोचायला पाहिजे. मात्र दोन महिन्याचा आहार एकाच वेळी शाळेला पुरविला जात असल्याचेही अॅड. मेश्राम यांच्या भेटीत दिसून आले.
या सर्व बाबीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी अॅड. मेश्राम यांनी केली आहे. भेटीदरम्यान कुणाल पेंदोरकर, उपसरपंच कमलेश खोब्रागडे, पंकज बारसिंगे, मुख्याध्यापिका ए. आर. लांजेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरूषोत्तम मोहुर्ले, अरूण नैताम, रमेश नैताम आदी हजर होते.