पोलिसांच्या रिक्त पदांच्या भरतीला हिरवी झेंडी नाही
By admin | Published: February 9, 2016 01:09 AM2016-02-09T01:09:15+5:302016-02-09T01:09:15+5:30
राज्य शासनाने गडचिरोलीसह राज्याच्या सर्वच जिल्ह्यात पोलीस प्रशासनातील विविध विभागात पद भरती प्रक्रिया हाती घेतली आहे.
प्रस्ताव मंजुरीसाठी पडून : पदसंख्या वाढण्याची शक्यता
गडचिरोली : राज्य शासनाने गडचिरोलीसह राज्याच्या सर्वच जिल्ह्यात पोलीस प्रशासनातील विविध विभागात पद भरती प्रक्रिया हाती घेतली आहे. त्याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ८२ जागांसाठी पोलीस शिपाई पदाची भरती होणार आहे. मात्र जिल्ह्यात पोलिसांच्या १६३ जागा रिक्त आहे. मात्र या जागांवरही पदभरती करण्यात यावी, याबाबतचा प्रस्ताव स्थानिक पोलीस प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. मात्र या प्रस्तावाला अद्याप हिरवी झेंडी मिळालेली नाही. त्यामुळे या जागांच्या पदभरतीबाबत हालचाली थंड आहेत. या जागांना मान्यता मिळाल्यास नव्या ८२ व रिक्त असलेल्या १६३ अशा २४५ जागांची पदभरती घ्यावी लागणार आहे. विद्यमान ८२ जागांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी ३९, अनुसूचित जातीसाठी सहा, अनुसूचित जमातीसाठी २०, इतर मागासवर्गीयांसाठी पाच, वि.ज. अ. मधून एक, वि.ज.ब. मधून दोन, भ.ज.क. मधून दोन, विमाप्रमधून एक, जागा भरली जाणार आहे. विविध पोलीस ठाण्यात रिक्त असलेल्या १६३ जागा भरण्याला शासनाने अद्याप मंजुरी दिलेली नाही. गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने येथे १०० टक्के पोलिसांची पदे भरावीत, असे पोलीस अधीक्षकांनी शासनाला सुचविले आहे. परंतु १०० टक्के पदभरतीबाबत अद्याप शासनाने सिग्नल न दिल्यामुळे ही भरती रखडलेली आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनीही काही माध्यमांशी बोलताना बाबीला दुजोरा दिला आहे. शासनाकडे १०० टक्के पदभरतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)