सहा महिन्यांपासून नियोजन समितीची बैठक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2016 01:45 AM2016-12-30T01:45:38+5:302016-12-30T01:45:38+5:30
जुलै २०१६ मध्ये गडचिरोली जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक पार पडली.
पालकमंत्र्यांवर निष्क्रीयतेचा जि.प. सदस्यांचा आरोप
गडचिरोली : जुलै २०१६ मध्ये गडचिरोली जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक पार पडली. मागील सहा महिन्यांपासून त्यानंतर एकही बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्याचा संपूर्ण विकास आराखडा रखडून पडला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजनांची कामे यामुळे अडचणीत आली आहेत.
नियोजन समितीवर सदस्य असलेल्या २० जिल्हा परिषद सदस्यांनी २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्र्यांना पत्र देऊन नियोजन समितीची सभा बोलविण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही पालकमंत्र्यांनी सभा बोलविली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विकास कामे रखडून पडली आहेत. याचा फटका २०१६-१७ च्याही विकास कामांनाही बसणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे विविध विभागाचे जि.प. अंतर्गत कामे ठप्प आहे. पालकमंत्री सर्वसामान्यांच्या समस्येबाबत निष्क्रीय असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)