रब्बीसाठी सवलतीचे बियाणे नाही
By Admin | Published: November 9, 2016 02:26 AM2016-11-09T02:26:28+5:302016-11-09T02:26:28+5:30
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला १३ वने ७ टक्के वन महसूल अनुदानातून यंदा केवळ दोन लाख रूपयांची तरतूद करण्यात आली.
शेतकरी अडचणीत : जि.प.च्या कृषी विभागाकडे निधीचा अभाव
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला १३ वने ७ टक्के वन महसूल अनुदानातून यंदा केवळ दोन लाख रूपयांची तरतूद करण्यात आली. या अल्पशा निधीतून जि.प.च्या कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामात ५० टक्के अनुदानावर २२ क्विंटल तूर बियाण्यांचे शेतकऱ्यांना वाटप केले. मात्र आता जि.प.च्या कृषी विभागाकडे रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सवलतीतील बियाणे पुरविण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने बियाणे उपलब्ध झाले नाही. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुके मिळून रब्बी पिकांचे सर्वसाधारण हेक्टर क्षेत्र एकूण २३ हजार ४०० इतके आहे. यंदा सन २०१६-१७ च्या वर्षात जि.प.च्या कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी ५ हजार २८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित म्हणून नियोजन केले. रब्बी हंगामासाठी शासनाकडे ५ हजार ९८२ क्विंटल बियाण्यांची मागणी केली असून जिल्ह्याच्या काही कृषी केंद्रात सदर बियाणे उपलब्ध आहेत. मात्र ही बियाणे शेतकऱ्यांना सवलतीत दिली जात नाही. जि.प.च्या कृषी विभागामार्फत दरवर्षी पाच लाखावर निधीतून गरीब शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर खरीप व रब्बी या दोन्ही हंगामासाठी बियाणे पुरविले जात होती. मात्र सन २०१६-१७ च्या जि.प.च्या अर्थसंकल्पात कृषी विभागाच्या तरतूदीस कात्री लावण्यात आल्यामुळे सवलतीत बियाणे मिळण्याची शेतकऱ्यांची आशा मावळली आहे.
१३ वने ७ टक्के वन महसूल अनुदानांतर्गत जि.प.च्या कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामात ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना तेलवर्गीय बियाणे पुरविण्याची योजना कार्यान्वित केली होती. या योजनेंतर्गत खरीप हंगामात २२ क्विंटल तूर बियाणे व पाच लाख रूपयातून सवलतीत १४९ क्विंटल सोयाबिन बियाणे शेतकऱ्यांना पुरविली. मात्र रब्बी हंगामासाठी निधी उपलब्ध नसल्याने जि.प.च्या कृषी विभागाला ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना बियाणे पुरविणे शक्य झाले नाही.
गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र एक हजार हेक्टर असून यंदा १ हजार ५४५ हेक्टर क्षेत्रात कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. ज्वारीचे सर्वसाधारण हेक्टर क्षेत्र ६ हजार ५०० असून कृषी विभागाने ७ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. हरभरा पिकाचे २ हजार ८०० सर्वसाधारण हेक्टर क्षेत्र असून ७ हजार ६६० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पंचायत समिती कार्यालयात शेतकऱ्यांच्या चकरा
आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात हरभरा, मूग, उडीद, भूईमूग, वाटाणा आदी रब्बी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सदर पिकांच्या लागवडीसाठी जि.प. मार्फत सवलतीतील बियाणे उचलण्यासाठी अनेक शेतकरी पंचायत समिती कार्यालयात वारंवार चकरा मारीत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी थेट जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला.
कृषी केंद्रात साडेतीन हजार क्विंटल बियाणे उपलब्ध
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पिकांच्या बियाण्यांसाठी धावपळ करावी लागू नये, याकरिता जि.प.च्या कृषी विभागाने आधीच नियोजन करून रब्बी पिकांच्या बियाण्यांची शासनाकडे मागणी केली. आतापर्यंत जिल्ह्याच्या अनेक कृषी केंद्रात साडेतीन हजार क्विंटल वर हरभरा, मूग, उडीद व इतर बियाणे उपलब्ध झाली आहेत. विक्रीसाठी बियाणे ठेवण्यात आली आहे. रब्बी हंगामातील मागणीनुसार उर्वरित बियाणे येत्या पाच-सहा दिवसात जिल्हाभरातील कृषी केंद्रांवर पोहोचणार असल्याची माहिती जि.प. कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.