दिव्यांगांचे सर्वेक्षण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:27 AM2021-05-29T04:27:11+5:302021-05-29T04:27:11+5:30
गडचिराेली : केंद्र व राज्य शासनाने दिव्यांगांच्या हितासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. मात्र, तालुक्यात योजनांची अंमलबजावणी झाली ...
गडचिराेली : केंद्र व राज्य शासनाने दिव्यांगांच्या हितासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. मात्र, तालुक्यात योजनांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे दिव्यांग विकासापासून वंचित आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात आले नाही.
अनेक कोल्हापुरी बंधारे जीर्णावस्थेत
गडचिरोली : सिंचन विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही.
जिल्ह्यात भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले
गडचिरोली : भाजीपाल्याला चांगला भाव मिळत आहे. त्याचबरोबर धान पीक निघाल्यानंतर त्याच शेतीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे शेतकरी आता भाजीपाला पिकाकडे वळत चालला आहे.
पुलावर कठडे नाही
अहेरी : तालुक्यातील रायगट्टानजीक पुलावर कठडे नसल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. सदर पूल कमी उंचीचा असल्याने पुलावरून पावसाळ्यात नेहमीच पाणी असते. परिणामी, अनेकदा वाहतूक ठप्प होते. त्यामुळे पुलावर कठडे लावावे, अशी मागणी आहे.
वन विभागात पदे रिक्त
गडचिरोली : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजारांपेक्षा अधिक वनकर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत असल्याने लाकूड तस्करी सुरू आहे.
मुद्रांक विक्रीत नागरिकांची लूट
गडचिरोली : विविध कामांसाठी लागणाऱ्या मुद्रांकाची विक्री शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने सुरू आहे. १०० रुपये किमतीचे मुद्रांक ११०, ५०० रुपयांचे मुद्रांक ५१० रुपयांना विकल्या जात आहे.
डिजिटल बॅनरमुळे पेंटर झाले बेराेजगार
सिरोंचा : संगणकाद्वारे विविध मल्टी कलरचे आकर्षक बॅनर मशीनद्वारे बनविण्यात येतात. ते कमी किमतीत कमी वेळात उपलब्ध होतात. त्यामुळे विविध रंगांचे डबे व ब्रश घेऊन दिसणारे पेंटर आता दिसेनासे झाले आहेत.
येवली येथे जलद बसचा थांबा द्या
गडचिरोली : येथून जवळच असलेल्या येवली येथे जलद बस थांबा आहे. मात्र, गडचिरोली आगाराच्या बसगाड्याव्यतिरिक्त इतर आगाराच्या जलद बसगाड्या येथे थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांना गडचिरोली आगारात बसगाडी बदलावी लागत आहे. त्यामुळे येथे जलद बसथांबा देण्याची मागणी होत आहे.
लोंबकळणाऱ्या तारांमुळे वाढला धोका
धानोरा : शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच इतरही वॉर्डांमध्ये विजेच्या तारा लोंबकळत आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी वीज विभागाकडे तक्रारही केली आहे. मात्र, वीज वितरण कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
कलेक्टर कॉलनीत सांडपाण्याची दुर्गंधी
गडचिरोली : शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत समजल्या जाणाऱ्या कॉम्प्लेक्स परिसरातील कलेक्टर कॉलनीतील ड्रेनेजलाइन फुटली आहे. त्यामुळे सांडपाण्याची दुर्गंधी येत आहे. सातत्याने मागणी करूनही पालिका प्रशासनाचे समस्यांकडे दुर्लक्ष आहे.
सट्टापट्टीसाठी इंटरनेटचा वापर वाढला
कुरखेडा : तालुक्यासह जिल्हाभरातील शहरी भागात सट्टापट्टीचे नंबर पाहण्यासाठी मोबाइलद्वारे इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. अनेक लोक भ्रमणध्वनीवर इंटरनेटद्वारे सट्टापट्टीचे नंबर शोधताना दिसून येतात. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
गोगाव-पिपरटोला मार्गाची दुरुस्ती करा
गडचिरोली : तालुक्यातील गोगाव-पिपरटोला या मार्गाची अनेक दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
आलापल्ली येथे गतिरोधक निर्माण करा
आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची गर्दी दर्शनासाठी दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु या मार्गाने भरधाव वाहनांचे आवागमन असते. येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांचेही आवागमन असते.
सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच
अहेरी : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यातून अवैध गुटखा विक्रीस आणल्या जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आलापल्ली येथे बंधाऱ्याचे बांधकाम करा
आलापल्ली : परिसरातील गावांमध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. गावात अल्प हातपंप सुरू असल्याने येथे नव्याने हातपंपही निर्माण करावे, अशी मागणी आहे. या भागात सिंचन सुविधा ताेकड्या असल्याने याचा परिणाम दाेन्ही हंगामातील विविध पिकांवर हाेत आहे.
खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे.
प्रभारी लाइनमनमुळे नागरिकांना त्रास
अहेरी : जिल्ह्यातील बहुतांश गावात लाइमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. आता हिवाळा सुरू असला तरी दिवसामागे वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वीज सुरळीत करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक गावांसाठी लाइनमन द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा
कुरखेडा : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंदी घातली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. अनेक युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला. कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची अडचण वाढली आहे.
कोंडवाड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी
आरमाेरी : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीने कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, निधीअभावी कोंडवाड्याची दुरवस्था झाल्याने जनावरांचे हाल होत आहेत. कोरोनामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात घट झाली. त्यामुळे ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. कोंडवाड्याची दुरुस्ती करणे अडचणीचे होत आहे.
रस्त्यावर कचरा टाकण्यास आळा घाला
गडचिराेली : शहरातील विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाॅर्डातील नाल्यांचा उपसा होत नाही. त्यामुळे तुडुंब भरल्या आहेत. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. डासांचे प्रमाण वाढून आजार होऊ शकतात. त्यामुळे नगर परिषदेने स्वच्छता कर्मचाऱ्यांना तातडीने वाॅर्डात पाठवावे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
शिंगाडा उत्पादनासाठी हवे अर्थसाह्य
कुरखेडा : जिल्ह्यातील विविध तालुक्यांत कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद विविध मालगुजारी तलावात मत्स्यपालन व सिंगाड्याचे उत्पादन घेतात; परंतु या व्यवसायाकरिता पैशाच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. मत्स्यपालन बिजाई व सिंगाडा लागवडीकरिता निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने अशा संस्थांना आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी मत्स्यपालन सहकारी संस्थांकडून हाेत आहे.
हॉटेल व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत
गडचिराेली : कोरोना लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय ठप्प पडले होते. दरम्यान, प्रशासनाने शिथिलता देत बाजारपेठ सुरू केली आहे. यामध्ये हॉटेलसुद्धा सुरू करण्यात आले आहे. मात्र, पाहिजे तसे ग्राहकच फिरकत नसल्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. शहरात तसेच जिल्ह्यात मोठ्या संख्येने हॉटेल्स आहेत.
पेट्रोल चोरट्यांचा बंदोबस्त करावा
गडचिराेली : शहरात मागील काही दिवसांपासून पेट्रोल चोरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलचोर शाळा, महाविद्यालय, शहरातील विविध चौक तसेच कॉम्प्लेक्समधील वाहनतळातून पेट्रोल चोरी करतात. पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. रात्रीच्या सुमारास गेटमधून प्रवेश करून चाेरटे पेट्राेल लंपास करीत आहेत.
शासकीय योजनांची माहिती नागरिकांना द्या
एटापल्ली : केंद्र व राज्य शासनाकडून नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. मात्र, या योजनांची माहितीच अनेकांपर्यंत पोहोचविली जात नाही. परिणामी, पात्र नागरिक योजनांपासून वंचित राहतात. संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास योग्य माहिती मिळत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.
कोचिंग संचालक आर्थिक संकटात
अहेरी : गावात ट्यूशन क्लास घेऊन उदरनिर्वाह करणाऱ्या बेरोजगार युवकांचे कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. शाळा सुरू झाल्या नाही. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी अद्यापही शिकवणी लावली नाही. परिणामी, गावातील बेरोजगार युवकांचे आर्थिक नुकसान होत आहे. ऑनलाइन शिक्षण दिले जात असले तरी काेचिंग संचालकांचे शुल्क देण्याबाबत विद्यार्थी व पालक उदासीन आहेत.