कालेश्वरम मंदिरातील साडीच्या चोरीचे रहस्य अद्याप कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:05 AM2018-07-28T00:05:07+5:302018-07-28T00:06:02+5:30
गडचिरोलीच्या सिरोंचा शहरापासून आठ कि.मी.अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध कालेश्वर व मुक्तेश्वर मंदिरातील पार्वती देवीला मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी अर्पण केलेली महागडी साडी चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : गडचिरोलीच्या सिरोंचा शहरापासून आठ कि.मी.अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध कालेश्वर व मुक्तेश्वर मंदिरातील पार्वती देवीला मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी अर्पण केलेली महागडी साडी चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संपूर्ण यंत्रणा कामी लागली असताना या साडी चोरीचे रहस्य अजून उलगडले नाही. दरम्यान तेलंगणा सरकारने या मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे ई.ओ.हरीप्रकाश आणि बुर्री श्रीनिवास यांना गुरूवारी तर सहायक धर्मदायक आयुक्त उमा माहेश्वर राव यांना शुक्रवारी निलंबित केले.
दोन वर्षांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांनी सपत्निक या मंदिरात दर्शन घेऊन मंदिरातील पार्वती देवीला सोन्याचा मुकूट व साडी अर्पण केली होती. महाराष्ट्र सीमेवरील मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाच्या कोनशीला अनावरणासाठी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव २ जून २०१६ रोजी कालेश्वरला आले होते. कार्यक्र मापूर्वी त्यांनी पत्नीसह या मंदिराला भेट देऊन कालेश्वर-मुक्तेश्वर स्वामींची पूजाअर्चा करून दर्शन घेतले. यावेळी सोन्याच्या मुकुटासह किमती साडी भेट दिली होती. मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेल्या या साडीची चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. साडी चोरी झाल्याची बातमी बाहेर येताच भुपालपल्ली (करीमनगर) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आदींनी मंदिराला भेट देऊन प्रकरणाची माहिती जाणून घेतली.
पुजाऱ्यांवर संशय
विशेष म्हणजे ही साडी अर्पण केल्यानंतर काही दिवसातच चोरीला गेली. मात्र विश्वस्तांनी कोणतीही वाच्यता न करता तशीच दिसणारी दुसरी साडी आणून ठेवली. हा प्रकार गेल्या दोन वर्षात नेमका कधी घडला हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या दोन वर्षाच्या काळातील तत्कालीन दोन विश्वस्त एका सहायक धर्मदाय आयुक्तांना निलंबित करण्यात आले. मंदिराच्या पुजाºयांना नोटीस देण्यात आली.