कुणकुण लागली अन् चितळाच्या चार शिकाऱ्यांना मांसासह उचलले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 07:28 PM2023-03-10T19:28:46+5:302023-03-10T19:32:03+5:30
लाेमेश बुरांडे चामोर्शी ( गडचिरोली ): जंगलात चितळाची शिकार करून घरी मांस आणून त्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असलेल्या शिकाऱ्यांच्या ...
लाेमेश बुरांडे
चामोर्शी (गडचिरोली): जंगलात चितळाची शिकार करून घरी मांस आणून त्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असलेल्या शिकाऱ्यांच्या घरी वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ८ मार्च रोजी रात्री १२:३० वाजताच्या सुमारास धाड टाकून मांसासह साहित्य जप्त केले. एवढेच नव्हे तर रात्रीच चारही आरोपींनासुद्धा ताब्यात घेऊन घरून उचलून नेले. ही कारवाई कुनघाडा वनपरिक्षेत्रातील कुथेगाव येथे केली.कुनघाडा वनपरिक्षेत्रातील कुथेगाव येथे ८ मार्च रोजी शिकार झाल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार वनाधिकाऱ्यांनी रात्री १२:३० वाजताच्या सुमारास संशयीत आरोपींच्या घरी धाड टाकून त्यांच्या घराची पाहणी केली. तेव्हा आरोपींच्या घरून कापून तुकडे केलेले वन्यप्राण्याचे मांस आढळून आले. त्यावरून त्यांची चौकशी करून मांस, शिकारीकरिता वापरलेल्या जाळ्या (वाघरी), सत्तूर, विळा, आदी साहित्य ताब्यात घेऊन जप्तीनामा व पंचनामा केला.
आरोपीस वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून त्यांची चौकशी करून कबुली जबाब नोंदविला. आरोपींमध्ये विठ्ठल मेसो हलामी, गजानन बुधू पोटावी, सुधाकर डोकू उसेंडी, रामचंद्र येसू कड्यामी सर्व राहणार कुथेगाव आदींचा समावेश आहे. आरोपींविरोधात वनगुन्हा नोंदविण्यात आला. शिकार झाल्याची कुणकुण गावात लागली अन् शंकेला पेव फुटले व वनाधिकाऱ्यांना गावातीलच कुणी लाोकांनी माहिती दिली व कारवाई झाली. घटनेचा अधिक तपास गडचिरोलीचे सहायक वनसरंक्षक सोनल भडके व वनपरिक्षेत्राधिकारी आर. एन. तांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली जोगनाचे क्षेत्रसहायक आर.पी. धाईत, कुथेगावचे वनरक्षक एन. बी. गोटा हे करीत आहेत.
१४ दिवसांची कोठडी; दोघे मोकाट
दरम्यान आवश्यक कार्यवाही पूर्ण करून आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची वनकोठडी सुनावली. तसेच आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता आणखी ६ इसम यात सहभागी असल्याची माहिती मिळाली. त्यावरून ९ मार्च रोजी चारही आरोपींना चामोर्शी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर चारही आरोपींना ९ ते २३ मार्चपर्यंत एकूण १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. चारही आरोपींची रवानगी चंद्रपूरच्या कारागृहात केली. सदर प्रकरणातील दोन आरोपी मोकाट आहेत.