पाणी योजनांच्या मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी लागली चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 01:00 AM2017-04-18T01:00:00+5:302017-04-18T01:00:00+5:30

गडचिरोली जिल्ह्यात कुनघाडा, कुरूड, येनापूर व आलापल्ली पाणी पुरवठा योजनेचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

There was a fight to get credit for approval of water schemes | पाणी योजनांच्या मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी लागली चढाओढ

पाणी योजनांच्या मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी लागली चढाओढ

Next

जुन्या सरकारचे काम : भाजपकडूनही पाठपुराव्याचा दावा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कुनघाडा, कुरूड, येनापूर व आलापल्ली पाणी पुरवठा योजनेचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे.
तत्कालीन आघाडी सरकारच्या काळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषदेवर सत्ता असताना चामोर्शी तालुक्यातील तीन पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव तसेच आलापल्ली भागातील पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यामुळे या पाणी पुरवठा योजनांना आपल्यामुळे मंजुरी मिळाल्याचा दावा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम हलगेकर यांनी केला आहे. तर या सर्व योजना चामोर्शी तालुक्यातील होत्या. त्यावेळच्या येथील जिल्हा परिषद सदस्य प्रतीभा गद्देवार, विजया विठ्ठलानी व अतुल गण्यारपवार यांनी या योजनांसाठी शासनाकडेही पाठपुरावा केला होता, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. मात्र त्यावेळी या योजनांसाठी निधी मंजूर झालेला नव्हता. यांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे गेलेले होते. आता मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळाली आहे व त्यांच्या कामाची निविदाही निघाली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आपल्यामुळेच हे काम झाले, असा दावा करीत आहेत. काँग्रेस वगळता राकाँ व भाजप, गण्यारपवार समर्थकांनी या पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीत आपले श्रेय असल्याचे दावा केल्याने लोकांचे मनोरंजन होत आहे. किमान आता तरी या पाणी पुरवठा योजनेचे काम तत्काळ मार्गी लागावे, अशी आशा सर्वसामान्यांनी व्यक्त केली आहे.
आलापल्लीसाठी ९ कोटी १३ लाख, कुनघाडा रै. साठी ५ कोटी ११ लाख, येनापूरसाठी ८ कोटी ६४ लाख व कुरूडसाठी ८ कोटी २९ लाखांची योजना मंजूर करण्यात आली आहे. या संदर्भात बोलताना विद्यमान जि.प. सदस्य अतुल गण्यारपवार यांनी त्यावेळी या योजना लहान व कमी गावांच्या होत्या. यातील गावांची संख्या वाढवून या योजनांना फिल्टर प्लॅन्टही करण्याबाबत आपणच पुढाकार घेतला होता व यासाठी प्रस्तावही तयार केले होते. गद्देवार, विठ्ठलानी यांचेही या कामात श्रेय आहे, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: There was a fight to get credit for approval of water schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.