गडचिरोली जिल्ह्यातील ४५ पूल झाले कालबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:08 AM2018-01-27T11:08:35+5:302018-01-27T11:11:16+5:30
दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या आणि वाहनांची संख्या, वाढलेली वर्दळ पाहता सध्या गडचिरोली जिल्ह्यात अस्तित्वात असलेले ४५ पूल आता कुचकामी ठरत आहेत.
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या आणि वाहनांची संख्या, वाढलेली वर्दळ पाहता सध्या गडचिरोली जिल्ह्यात अस्तित्वात असलेले ४५ पूल आता कुचकामी ठरत आहेत. पावसाळ्यात हे सर्व पूल पाण्याखाली जाऊन शेकडो गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे त्यांची पुनर्बांधणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी सद्यस्थितीत २२७ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
जिल्ह्यातील अनेक पूल ठेंगणे आहेत. पावसाळ्यात नद्यांना पूर आला किंवा त्या दुथडी भरून वाहू लागल्या तरी हे पूल पाण्याखाली जातात. त्यामुळे भामरागड, धानोरा, अहेरी, आरमोरी तालुक्यासह इतर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटून मोठी समस्या निर्माण होते. काही पुलांचे अॅप्रोच मार्गच वाहून गेले आहेत. त्यामुळे चारचाकी वाहन पैलतिरावर जाऊ शकत नाही. गंभीर अवस्थेत अनेक रुग्णांना गावातच जीव सोडावा लागतो. हे टाळण्यासाठी १४ मोठ्या आणि ३१ लहान पुलांची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे.
परंतु त्यासाठी लागणाऱ्या २२७ कोटी रुपयांच्या खर्चाची सोय कोण करणार? हा प्रश्न उभा ठाकला आहे.बांधकाम विभागाच्या आराखड्यानुसार मोठ्या १४ पुलांच्या पुनर्बांधणीसाठी १८६ कोटी रुपयांची तर ३१ लहान पुलांच्या पुनर्बांधणीसाठी ४१.२५ कोटी रुपयांची गरज आहे. नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात राज्य शासनाकडून व जिल्हा निधीतून रस्ते व पुलांच्या कामांसाठी किती निधी उपलब्ध केला जातो, हे पाहून त्यानुसार प्राधान्यक्रमाने कोणती कामे घ्यायची हे ठरविण्यात येणार आहे.
या ४५ पुलांमध्ये सर्व चारही विधानसभा मतदार संघांच्या आमदारांनी प्रस्तावित केलेले आणि नक्षलविरोधी अभियान सुरळीतपणे राबविण्यासाठी पोलीस विभागाने प्रस्तावित केलेले काही पूल आहेत.
योजनांसाठी कोट्यवधी, सुविधांसाठी नाही
गडचिरोली जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. नक्षल समस्येवर विकास हाच तोडगा असल्याचे सांगितले जाते. पण रस्ते व पुलासारख्या मूलभूत सुविधांसाठी निधी देताना मात्र केंद्र व राज्य शासन हात आखडता घेत आहे. परिणामी नागरिकांना विविध समस्यांला तोंड द्यावे लागते.
पर्लकोटावरील पुलासाठी ५५ कोटींची गरज
भामरागडलगत असलेल्या पर्लकोटा नदीवरील पुलाचे पाणी यावर्षी गावात शिरून हाहाकार उडाला होता. या नदीवरील पूल ठेंगणाच नाही तर अरुंदही आहे. जवळपास २०० मीटर लांबीच्या या पुलाची पुनर्बांधणी करण्यासाठी ५५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याशिवाय आलापल्ली-भामरागड रस्त्यावर बांडिया नदीवरील पुलासाठी ३५ कोटी तर याच रस्त्यावर पेरमिली नाल्यावरील पुलासाठी २० कोटींचा खर्च येणार आहे.