शांतीच्या मार्गाने दु:खाचे हरण होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:00 AM2017-10-23T00:00:16+5:302017-10-23T00:00:26+5:30
बुद्धाने सांगितलेल्या शांतीच्या मार्गाचा अवलंब जीवन जगताना केल्यास दु:ख दूर होते. त्यामुळे प्रत्येकाने शांतीच्या मार्गाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन भंते भगीरथ यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : बुद्धाने सांगितलेल्या शांतीच्या मार्गाचा अवलंब जीवन जगताना केल्यास दु:ख दूर होते. त्यामुळे प्रत्येकाने शांतीच्या मार्गाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन भंते भगीरथ यांनी केले.
घोट परिसरातील कोठरी येथे बौद्ध विहारात वर्षावास समारोप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या अरण्यवास समारोप सोहळ्याला भंते अनोमदसी, भंते धम्मरक्षीत, भदंत महाथेरो बुद्धघोष, भि. सुजाता आर्य आसेगाव पुरणा, भंते दीपकर, भंते धम्मपाल, भंते प्रज्ञानद, भंते शांतीज्योती, भंते सोनचारगाव, भंते शिलानंद आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना भंते भगीरथ म्हणाले, जन्माला येताच माणसाला तीन कारण उपस्थित होतात. त्यामुळे दु:ख निर्माण होते. जन्म हे दु:खाचे कारण आहे. म्हातारपण होण्यामुळेही दु:ख निर्माण होते तर मृत्यू हे त्यापेक्षाही अधिक दु:खाचे कारण आहे. राजा धार्मिक असला की, प्रजा धार्मिक होते. प्रजा धार्मिक झाली म्हणजे मध्यम व गरीब जनतासुद्धा धार्मिक होते. ज्या देशातील जनता धार्मिक राहते, त्या देशात समृद्धी नांदते. राजा, प्रजा व मध्यवर्गीय लोक अधार्मिक व भ्रष्टाचारी झाले तर देशाची हानी होते, असे मार्गदर्शन भंते भगीरथ यांनी केले.