१४ हंगामी वसतिगृह होणार
By admin | Published: November 8, 2014 10:36 PM2014-11-08T22:36:44+5:302014-11-08T22:36:44+5:30
रोजगारासाठी दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरीत होणाऱ्या मजुरांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी गडचिरोली शिक्षण विभागाच्यावतीने यावर्षी जिल्ह्यात १४ हंगामी वसतिगृह स्थापन
प्रक्रिया सुरू : रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांच्या पाल्यांसाठी
गडचिरोली : रोजगारासाठी दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरीत होणाऱ्या मजुरांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी गडचिरोली शिक्षण विभागाच्यावतीने यावर्षी जिल्ह्यात १४ हंगामी वसतिगृह स्थापन करण्यात येणार आहेत. सदर हंगामी वसतिगृह १५ नोव्हेंबरपासून सुरू केले जाणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नसल्याने येथील नागरिकांना रोजगारासाठी नेहमीच वनवन करावी लागते. जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेती हा व्यवसाय करीत असले तरी सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने केवळ खरीप हंगामाचेच पीक घेतले जाते. यातून जवळपास तीन महिने गावातच रोजगार मिळतो. उर्वरित ९ महिने मात्र रिकामे राहण्याची पाळी येते. रिकाम्या कालावधीत येथील बहुतांश मजूर व अल्पभूधारक शेतकरी मिळेल तो रोजगार करण्यासाठी परजिल्ह्यात जातात. रोजगारासाठी जातांना आपल्या मुलालाही सोबत घेऊन जातात. महिना दोन महिने दुसऱ्या गावी राहल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होते.
शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी बनली आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येत असून त्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्यात येत आहेत. स्थलांतरीत मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर शिक्षण विभागाने स्थलांतरीत मजुरांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या भागातील मजूर नेहमी स्थलांतरीत होतात, अशा भागात १४ वसतिगृह सुरू केले जाणार आहेत. या १४ वसतिगृहांची प्रवेश क्षमता ५३५ विद्यार्थी एवढी असून या वसतिगृहासाठी २१ लाख ९३ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या वसतिगृहांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपविण्यात आली आहे. सदर वसतिगृह सत्र संपेपर्यंत म्हणजेच ३० एप्रिल २०१५ पर्यंत चालविले जाणार आहेत.
शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे पालक वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात असून ही समस्या संपूर्ण जिल्हाभर कमी-जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे वसतिगृहांची संख्याही वाढवावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)