तालुक्यात २४ तलाठी साजे होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:02 AM2017-09-10T01:02:00+5:302017-09-10T01:02:49+5:30
शासनाने सध्या अस्तित्वात असलेल्या महसूल मंडळ व तलाठी साजाची विभागणी करून नवे महसूल मंडळ व तलाठी साजे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : शासनाने सध्या अस्तित्वात असलेल्या महसूल मंडळ व तलाठी साजाची विभागणी करून नवे महसूल मंडळ व तलाठी साजे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार धानोरा तालुक्यात नव्याने २४ तलाठी साजे व चार महसूल मंडळ होणार आहेत.
सद्य:स्थितीत धानोरा तालुक्यात २२८ गावे असून २४ तलाठी साजे व चार महसूल मंडळ आहेत. नवे व जुने मिळून एकूण ४७ तलाठी साजे व आठ महसूल मंडळांची निर्मिती होणार आहे. धानोरा तालुक्यात नवरगाव, गिरोला, कटेझरी, कुलभट्टी, सुरसुंडी, फुलबोडी, मंगेवाडा, तुकूम, मिचगाव बु. साखेरा, कोंदावाही, पुस्टोला, जप्पी, मुरगाव, चव्हेला, चिचोली, जांगदा, मिचगाव (झाडा), मुंगनेर, मोहगाव, सावंगा, कामनगड व झाडापापडा या ठिकाणी नवीन तलाठी साजे निर्माण करण्यात येणार आहे. तसेच रांगी, कारवाफा, गट्टा, सुरसुंडी हे नवे चार महसूल मंडळ कार्यालय निर्माण करण्यात येणार आहे. या नव्या साजा संदर्भात आक्षेप असल्यास संबंधितांनी २५ सप्टेंबरपूर्वी आक्षेप तहसील कार्यालयात नोंदवावे, अशी माहिती धानोराचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी दिली आहे. लोकमतने यापूर्वीच हिवाळी अधिवेशनादरम्यान धानोरा तालुक्यात नवे तलाठी साजे निर्माण करण्यात यावे, अशा मागणीचे वृत्त प्रकाशित करून सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाने याची दखल घेतले असल्याने महसूल मंडळाच्या कारभारात व कार्यात सुसूत्रता व गती येणार आहे.
गडचिरोलीत चार साज्यांची निर्मिती होणार
गडचिरोली तालुक्यात चांदाळा, देवापूर, राजोली व मारदा या चार ठिकाणी नव्याने तलाठी साजे निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी सोयीचे होणार आहे.