शहरात खुले जीम होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:40 PM2018-10-01T22:40:51+5:302018-10-01T22:41:14+5:30
आरोग्याच्या दृष्टिकोनातून शहरातील युवक, युवती, विद्यार्थी तसेच नागरिकांना व्यायाम तसेच शारीरिक कसरत करण्याची सुविधा निर्माण व्हावी, या उद्देशाने गडचिरोली पालिका प्रशासनाच्या वतीने शहरात खुली व्यायामशाळा (जीम) निर्माण करण्यात येणार आहे. यासंदर्भातील पालिका प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आरोग्याच्या दृष्टिकोनातून शहरातील युवक, युवती, विद्यार्थी तसेच नागरिकांना व्यायाम तसेच शारीरिक कसरत करण्याची सुविधा निर्माण व्हावी, या उद्देशाने गडचिरोली पालिका प्रशासनाच्या वतीने शहरात खुली व्यायामशाळा (जीम) निर्माण करण्यात येणार आहे. यासंदर्भातील पालिका प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे.
नगर पालिकेची सर्वसाधारण सभा २४ सप्टेंबर रोजी सोमवारला पार पडली. या सभेत पालिकेतर्फे निर्माण करावयाच्या व्यायाम शाळेचा ठराव पारित करण्यात आला. पालिकेच्या वतीने शासनाच्या निधीतून व्यायामशाळा तयार व्हावी, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. या सभेला प्रामुख्याने नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्यासह सर्व सभापती व नगरसेवक उपस्थित होते.
पालिका प्रशासनाच्या वतीने पालिकेच्या परिसरात व्यायामशाळा निर्माण करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार केला जात असून येत्या काही दिवसात हा प्रस्ताव अंतिम होणार आहे. त्यानंतर पालिकेच्या ठरावासह व्यायामशाळेचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यापूर्वीच मागील महिन्यात पालिकेचे पदाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकाºयांशी चर्चा केली होती. व्यायामशाळेच्या मुद्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पालिकेचा ठराव व प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर व्यायामशाळा मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन क्रीडाधिकाºयांनी चर्चेत दिले होते.
क्रीडा विभागाच्या योजनेतून पालिकेच्या परिसरात व्यायामशाळा उभारण्यात येणार आहे. जवळपास तीन ते साडेतीन लाख रूपयांचे सदर व्यायामशाळेचे बजेट राहणार आहे. पालिकेची व्यायामशाळा शहरातील युवक, युवती व नागरिकांना खुली राहणार असून सुविधेचा मोफत लाभ मिळणार आहे. पालिकेच्या वतीने शहरात प्रशस्त अशी व्यायामशाळा निर्माण करण्यासाठी नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे तसेच मुख्याधिकारी संजीव ओहोड यांनी पुढाकार घेतला आहे. दीपावलीनंतर व्यायामशाळेचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
खासगी जीम चालकांचा व्यवसाय मंदावणार
पालिकेच्या वतीने न.प.कार्यालयाच्या परिसरात व्यायामशाळा तयार करण्यात येणार असून येथे युवक, युवती तसेच नागरिकांसाठी व्यायामाचे अनेक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर व्यायामशाळेच्या लाभासाठी शुल्क आकारण्यात येणार नसल्याने या जीमकडे विद्यार्थी व युवकांचा ओढा वाढणार आहे. परिणामी खासगी जीममधील युवकांची गर्दी कमी होणार आहे. परिणामी त्यांचा व्यवसाय मंदावण्याची शक्यता आहे.