धानाचा प्रलंबित बाेनस व रब्बीतील चुकारे मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:39 AM2021-08-23T04:39:01+5:302021-08-23T04:39:01+5:30
खरीप हंगामासाठी थकीत चुकाऱ्यांमुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या जाणून आ. कृष्णा गजबे यांनी ...
खरीप हंगामासाठी थकीत चुकाऱ्यांमुळे येथील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या जाणून आ. कृष्णा गजबे यांनी २८ जुलै रोजी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊन आठ दिवसांच्या आत थकीत चुकारे व खरीप हंगामातील उर्वरित बोनसची रक्कम अदा करण्यात न आल्यास संपूर्ण जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी व शेतकऱ्यांच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
परंतु या समस्येची दखल घेण्यात न आल्याने आमदार गजबे यांनी देसाईगंज-कुरखेडा महामार्गावरील रेल्वे भूमिगत पुलाजवळ चक्का जाम आंदोलन करून लक्ष वेधले. त्यानुसार खरेदी-विक्री संस्थेच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या थकीत चुकाऱ्यांचे ४१८ कोटी रुपये व आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या धानाचे ८२ कोटी असे एकूण ५०० कोटी रुपये या संस्थेकडे वळते केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. किती दिवसात थकीत चुकारे व बाेनसची रक्कम बॅंक खात्यात जमा हाेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.