‘ते’ खऱ्या अर्थाने ठरले जलदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:36 PM2019-03-20T22:36:19+5:302019-03-20T22:37:00+5:30
कोणताही सजीव तहानेने अतिव व्याकूळ होऊन अगदी केविलवाणा होऊ लागला की, पाणी हेच त्या जीवाला परमेश्वर आणि अमृतासमान वाटते. अन्यथा पाण्याला त्याच्या महतीनुसार शोभेल असा मान अजून तरी मानव देतांना दिसत नाही. म्हणूनच आज माणूस पाण्यासाठी दाहीदिशा भटकतांना आणि टाहो फोडताना दिसून येतो.
अतुल बुराडे/विष्णू दुनेदार।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा/तुळशी : कोणताही सजीव तहानेने अतिव व्याकूळ होऊन अगदी केविलवाणा होऊ लागला की, पाणी हेच त्या जीवाला परमेश्वर आणि अमृतासमान वाटते. अन्यथा पाण्याला त्याच्या महतीनुसार शोभेल असा मान अजून तरी मानव देतांना दिसत नाही. म्हणूनच आज माणूस पाण्यासाठी दाहीदिशा भटकतांना आणि टाहो फोडताना दिसून येतो. परंतु या विज्ञान युगाला लाजवेल असे व्यक्तिमत्व देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे होऊन गेले. ते म्हणजे मनिराम ढोरे महाराज!
आज ‘पाणी वाचवा, पाण्याचा जपून वापर करा’ असे अनेक संदेश देत पाणी बचतीचे लाख प्रयत्न होत आहेत. तरीही अवस्था बिकटच आहे. त्यात सहा-सात दशकांपूर्वी आमगावच्या मनिराम ढोरे महाराजांनी पाण्याचे महत्त्व ओळखून आपल्या दोन्ही खांद्यावर कावड घेऊन सावंगी तसेच भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर परिसरात लोकांची तृष्णा भागविण्याचे काम केले. यातून त्यांनी पाण्याची खरीखुरी आवश्यकता आणि महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविले. २२ मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करताना मनिराम ढोरे महाराजांच्या कार्याचे स्मरण होते. पाण्यासाठी वाहिलेल्या त्यांच्या जीवन कार्यातून सकारात्मक प्रेरणा घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
आमगाव येथे जन्मलेल्या मनिराम महाराजांची कर्मभूमी आमगाव, सावंगी आणि लाखांदूर परिसर राहिला. काम काय तर स्वत:च्या खांद्यावर कावड घ्यायची नि विहीर वा जलसाठ्यातील पाणी तहानलेल्यांना पाजायचे. मंगळवार हा दिवस मनिराम महाराजांसाठी जणू सणाचा दिवस असायचा. कारण या दिवशी लाखांदूरला आठवडी बाजार भरायचा आणि यानिमित्त आलेल्या हजारो लोकांना ते कावडीने वाहिलेल्या पाण्याने तृप्त करायचे. यामुळे त्यांना पंचक्रोशीत पाणीवाले मनिराम ढोरे महाराज म्हणून ओळख प्राप्त झाली होती, जी आजही कायम आहे. कार्य व कीर्तीने मनिराम महाराज खऱ्या अर्थाने जलदूत ठरले आहेत.
सामाजिक कार्यांमध्येही महाराज अग्रणी
मनिराम ढोरे महाराज केवळ वाटसरूंना पाणी पाजण्याचेच काम करीत नव्हते, तर फावल्या वेळेत गावांतील जनावरांना गवत-चारा टाकायचे. अनेक सामाजिक कार्यात सहभाग घ्यायचे. त्यांच्या या कार्याला सलाम म्हणून सावंगीवासीयांनी मनिराम महाराजांच्या मृत्यूनंतर गावात देसाईगंज-लाखांदूर मुख्यमार्गाच्या बाजूला समाधी बांधली. पाणी आणि मनिराम महाराजांचे नाव घट्ट विणले गेले आहे. हे येथील समाधीला भेटी देणाºया लोकांच्या भावनिकतेतून प्रदर्शित होते.