‘ते’ १३ वीज खांब देताहेत अपघातास निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 10:14 PM2019-05-09T22:14:54+5:302019-05-09T22:16:00+5:30
आरमोरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक विद्युत खांब रस्त्यावर असल्याने येथे अपघाताची मालिका सुरू आहे. सद्य:स्थितीत राष्ट्रीय महामार्गावर १३ विद्युत खांब असून हे खांब अपघातास निमंत्रण देत आहेत. मात्र या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
विलास चिलबुले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक विद्युत खांब रस्त्यावर असल्याने येथे अपघाताची मालिका सुरू आहे. सद्य:स्थितीत राष्ट्रीय महामार्गावर १३ विद्युत खांब असून हे खांब अपघातास निमंत्रण देत आहेत. मात्र या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
आरमोरी शहरात राष्ट्रीय महामार्गावरील बर्डी टी-पार्इंट ते नवीन बसस्थानक, स्टेट बँकेजवळ, भगतसिंग चौक तसेच बँक आॅफ इंडियाजवळ, जुना बसस्थानक, संत जगनाडे महाराज चौक ते साई मंदिरपर्यंत १३ विद्युत खांब अपघातास आमंत्रण देत आहेत. बर्डी ते साई मंदिर या परिसरातून राष्ट्रीय महामार्गावरून ओव्हरलोड ट्रक, महामंडळाच्या बसगाड्या, खासगी बसगाड्या तसेच लहान-मोठे मिळून दररोज शेकडो वाहने आवागमन करीत असतात. वाहनाच्या धडकेमुळे या मार्गावरील तीन खांब तुटले आहेत. अपघातामुळे उर्वरित खांब तुटण्याच्या मार्गावर आहेत.
वीज खांबांमुळे भविष्यात मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या गंभीर समस्येकडे महावितरण व स्थानिक नगर परिषद प्रशासनाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर आलेल्या या खांबांमुळे रस्ता अरूंद होत असून वाहनधारकांना आवागमन करताना या खांबांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघात घडत आहेत.
लोकमतने या समस्येबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने दोन ते तीनच वीज खांब रस्त्यावरून हटवून इतरत्र लावण्यात आले. यापूर्वी रात्री ट्रकच्या अपघातामुळे तीन खांब तुटले. मात्र यात जीवितहानी झाली नाही
प्रशासकीय यंत्रणा आंधळी
आरमोरी शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध अनेक वीज खांब आहेत. हे खांब सर्व नागरिकांना दिसतात. मात्र प्रशासनाला दिसत नाही का, असा प्रश्न शहरातील नागरिकांपुढे उपस्थित होत आहे. अद्यापही १३ वीज खांब मार्गावर कायम असल्याने प्रशासकीय यंत्रणा आंधळी झाल्याचे वाटत आहे.
येत्या सहा महिन्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होणार असल्यामुळे त्यांच्या मार्फत सदर खांब हटविण्यात येणार आहेत. मात्र जे खांब रस्त्याच्या मध्ये आलेले आहेत, असे खांब हटविण्याच्या कार्यवाहीसाठी महावितरणकडे संपर्क करून मार्गदर्शन घेण्यात येईल. शहराच्या मुख्य मार्गावरील वीज खांब हटविण्यात येईल.
- हैदरभाई पंजवानी, उपाध्यक्ष, नगर परिषद, आरमोरी