यापुढे देवीदेवतांना दारू वाहणार नाही; एकरा खुर्द गावाने बदलली प्राचीन परंपरा
By दिगांबर जवादे | Published: June 5, 2023 06:50 PM2023-06-05T18:50:17+5:302023-06-05T18:50:52+5:30
दुर्गम भागातील आदिवासी आपल्या देवी देवतांना नैवेद्य म्हणून दारूचा वापर करतात. यामुळे नागरिकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याने सणासुदीला दारूऐवजी गाेड पदार्थ नवैद्य म्हणून वापरण्याचा निर्णय एटापल्ली तालुक्यातील एकरा खुर्द गावाने घेतला आहे.
दिगांबर जवादे
गडचिरोली : दुर्गम भागातील आदिवासी आपल्या देवी देवतांना नैवेद्य म्हणून दारूचा वापर करतात. यामुळे नागरिकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याने सणासुदीला दारूऐवजी गाेड पदार्थ नवैद्य म्हणून वापरण्याचा निर्णय एटापल्ली तालुक्यातील एकरा खुर्द गावाने घेतला आहे.
मुक्तीपथतर्फे दोन दिवशीय सघन बैठकीचे आयोजन या गावात करण्यात आले होते. यावेळी घरगुती दारू वापर करण्यावर बंदी घालण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. आदिवासी गावांमध्ये देवी, देवतांच्या पूजेसाठी किंवा सणासुदीला घरगुती दारूचा वापर केला जातो. परिणामी दारू पिणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असते. यामुळे सघन बैठकीच्या माध्यमातून घरगुती दारुचे प्रमाण कमी करण्यासह दारू निर्मितीवर बंदी घालण्यावर ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली.
त्यानंतर गाव संघटन बैठक, युवा संघटन बैठक, महिला बैठक, स्तनदा माता बैठक, गाव ग्राम सभा घेण्यात आली. रात्री ‘शाब्बास रे गण्या’ चित्रपट दाखवून व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देत व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन तालुका संघटक किशोर मलेवार यांनी केले. दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमासाठी माजी सरपंच लेबळू गोटा, सोमजी नरोटे, भूम्या दोहे गोटा , आरोग्य सेविका एस. एस. गोलकोंडावार, अंगणवाडी सेविका गिता करमरकर, जनाबाई नरोटी यांनी सहकार्य केले.