महिलांनी नष्ट केला सडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 06:00 AM2019-10-26T06:00:00+5:302019-10-26T06:00:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : तालुक्यातील रंगयापल्ली येथील महिलांनी गावाला लागून असलेल्या जंगलातून ५९ ड्रम गुळाचा तर एक ड्राम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील रंगयापल्ली येथील महिलांनी गावाला लागून असलेल्या जंगलातून ५९ ड्रम गुळाचा तर एक ड्राम मोहफुलसडवा पकडून नष्ट केला. तसेच गावात दारूविक्री करताना चौघांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले.
रंगयापल्ली येथील मुक्तिपथ संघटनेच्या महिला गावाला दारूमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. काही दिवसांपूर्वी गावात मुक्तिपथ तालुका चमूने एक बैठक घेतली असता नजीकच्या जंगलात मोठ्या प्रमाणात गावठी दारू काढली जात असल्याचे महिलांनी सांगितले. या बैठकीतनंतर महिलांनी दारू बनविण्याच्या परिसरात शोधमोहीम राबविली. संपूर्ण परिसर पिंजून काढला असता गुळाचा सडवा असलेले ५९ तर मोहाचा सडवा असलेला एक ड्रम असा एकूण ६० ड्रम सडवा सापडला. हा संपूर्ण सडवा आणि दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य महिलांनी नष्ट केले. याच दिवशी सायंकाळी गावात दारूची विक्री होत असल्याची माहिती महिलांना मिळाली. माहितीच्या आधारे महिलांनी चौघांना दारूविक्री करताना रंगेहात पकडले. सिरोंचा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी या चौघांवरही कारवाई केली.
महिला दारूविक्रेत्यांवर दंड
वारंवार सूचना देऊनही दारूविक्री करणाऱ्या दोन महिला विक्रेत्यांच्या घरी धाड टाकून लगाम येथील तंटामुक्त व मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी तब्बल ३० लीटर गावठी दारू जप्त केली. ग्रामसभा बोलावून या महिलांवर एकूण सात हजार रुपये दंड ठोठावला. सोबतच यापुढे दारू विकणार नाही, असे शपथपत्रही लिहून घेतले.