तेलंगणातून येते चोर बीटी बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 10:13 PM2019-05-19T22:13:25+5:302019-05-19T22:13:59+5:30
चोर बीटी (बीजी-३) या कापसाच्या वाणाची लागवड केल्यास शेतजमीन नापीक होते. तसेच मानवाला कॅन्सर होण्याचा धोका संभावतो. त्यामुळे शासनाने या बियाणांवर बंदी घातली आहे. मात्र तेलंगणातून चोरट्या मार्गाने सदर बियाणे जिल्ह्यात आणली जात आहेत.
सुधीर फरकाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : चोर बीटी (बीजी-३) या कापसाच्या वाणाची लागवड केल्यास शेतजमीन नापीक होते. तसेच मानवाला कॅन्सर होण्याचा धोका संभावतो. त्यामुळे शासनाने या बियाणांवर बंदी घातली आहे. मात्र तेलंगणातून चोरट्या मार्गाने सदर बियाणे जिल्ह्यात आणली जात आहेत. कृषी विभाग मात्र कोणतीही कारवाई करीत नसल्याने या बियाणांची खुलेआम विक्री जिल्हाभरात सुरू आहे.
मागील काही वर्षांपासून शेतकरी कापूस पिकाकडे वळले आहेत. चामोर्शी, सिरोंचा, मुलचेरा या तालुक्यांमध्ये दरवर्षी कापसाचा पेरा वाढत चालला आहे. कापसाच्या पिकात मोठ्या प्रमाणात गवत उगवत असल्याने गवत काढण्यावर शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करण्यासाठी शेतकरी तण नाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी करतात.
तण नाशकाची फवारणी केल्यास त्याचा काही प्रमाणात परिणाम संबंधित पिकावरही होतो. मात्र चोर बीटी या कापसाची लागवड केल्यास तण नाशकाचा काहीच परिणाम पिकावर होत नाही. त्यामुळे चोर बीची लागवड करून मोठ्या प्रमाणात शेतकरी तण नाशकांचा वापर करतात. तण नाशकाच्या अतिवापरामुळे शेतजमीन पूर्णपणे नापीक होते. तसेच पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होतो.
अतिशय घातक असलेली तण नाशके वापरली जात असल्याने मानवाला कॅन्सर होतो किंवा त्याचा मृत्यू सुध्दा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने चोर बीटी या बियाणांवर बंदी घातली आहे.
चामोर्शी, सिरोंचा या तालुक्यांच्या सीमा तेलंगणा राज्याला लागून आहेत. तेलंगणातही या बियाण्यांवर बंदी आहे. मात्र तेलंगणा राज्यातून प्रतिबंधीत बियाणे गडचिरोली जिल्ह्यात आणले जात आहेत.
कृषी विभागाची १३ पथके नावापुरतीच
बियाणे, कीटकनाशके, खत यांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाने १३ पथके स्थापन केली आहेत. प्रत्येक तालुक्यात एक पथक आहे. मात्र ही पथके केवळ कागदावरच आहेत. कृषी केंद्रांमध्ये खुलेआम चोर बीटी बियाण्यांची विक्री होत असताना सदर पथके कोणतीही कारवाई करीत नाही. यावरून कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी व कृषी केंद्र संचालक यांच्यामध्ये मिलीभगत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागाचे अधिकारी वर्ष उलटूनही एकाही कृषी केंद्रांवर कारवाई करीत नाही. याची पक्की खातरजमा येथील कृषी केंद्र संचालकांना झाली असल्याने बीटी बियाणांचा काळा बाजार वाढला आहे.
एकूण लागवडीच्या सुमारे ८० टक्के बियाणे चोर बीटी वापरले जात आहेत. मात्र कृषी विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आष्टी येथे लाखो रुपयांचे चोर बीटी बियाणे आढळून आल्यानंतरही कृषी विभागाने इतर कृषी केंद्रांची चौकशी सुरू केली नाही.