यावर्षी जिल्ह्यातील रेशीम टसर शेती अस्मानी संकटात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 03:57 PM2024-10-29T15:57:47+5:302024-10-29T16:01:41+5:30
हवामान बदलाचा परिणाम : चार महिन्यांचा हिरावणार रोजगार
प्रदीप बोडणे
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड :गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांच्या ज्या भागात येन, अंजनची झाडे आहेत. त्या जंगलात या भागातील ढीवर समाज बांधव परंपरागतरित्या मोठ्या प्रमाणात रेशीम शेती करतात. आता शासनाच्या सुविधेमुळे शेती फायद्याची ठरू लागली असल्याने रेशीम शेतीचे क्षेत्र वाढले आहे. पण, या वर्षात सततच्या ढगाळ वातावरणामुळे रेशीम शेतीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, यंदा टसर शेती अस्मानी संकटात सापडली आहे.
पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील ढीवर समाज बांधव मोठ्या प्रमाणात रेशीम शेती करतात. आरमोरी तालुक्यातील थोटेबोडी, मॅडबोडी, नागरवाई, कुरखेडा तालुक्यांतील कढोली, जांभळी, गांगुली परिसराच्या गावातील ढीवर समाज परंपरागत शेतीचा व्यवसाय करतात. रेशीम शेतीसाठी लागणारे अंडीपुंज पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या आरमोरी येथील रेशीम केंद्रातून आणतात.
रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अंडीपुंज सवलतीच्या दरात विकत मिळतात. ही अंडीपुंज जंगलातील येन किंवा अंजनाच्या झाडावर ठेवून त्यापासून होणारे अंडी कोश तयार करते. या वर्षात अंडीपुंज झाडावर उत्पन्नासाठी टाकल्यापासून वातावरणातील अति उष्णपणा, कधी थंडी या वातावरणातील बदलामुळे अंडीपुंज्यातून अंडी तयार झाल्यानंतर कोश निर्माण करण्यापूर्वी अनेकदा मरून पडल्या आहेत. या वर्षात कमी कोश निर्माण झाले आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला असून, यंदाची टसर रेशीम शेती तोट्याची होत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
"या वर्षातील अती पाऊस आणि त्यामुळे टसर शेती उशिरा झाली. त्यानंतर मात्र ऑक्टोबर हिंटने चांगलेच हैराण केले. वातावरणात अतिउष्णपणामुळे, अंडी पुंजाच्या अळ्यांची वाढ झाली नाही. कोश तयार झाले नाही."
- तुळशीराम सोनबावणे, शेतकरी, कढोली.
"रेशीम शेतीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला, तरी त्याच्यावर उपाययोजना झाल्यास शेती फायद्याची ठरते. पण, रेशीम टसर महामंडळाकडून आवश्यक द्रावणाचा पुरवठा न झाल्याने अनेक अळ्या मरण पावल्या."
- जितेंद्र भोयर, शेतकरी, कढोली.