यंदा महामंडळाची धान खरेदी १५ लाख क्विंटलवर जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 03:29 PM2024-10-08T15:29:52+5:302024-10-08T15:30:57+5:30
दिवाळीनंतर हंगाम सुरू होणार : बोनसमुळे वाढला शेतकऱ्यांचा कल
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : आदिवासी विकास महामंडळाच्या उपअभिकर्ता म्हणून आविका संस्थानी सन २०२३-२४ या खरीप हंगामात १३ लाख क्विंटल धानाची खरेदी केली होती. मागील वर्षातील धान पिकाला प्रतिकूल परिस्थिती असताना आदिवासी विकास महामंडळाने मोठ्या प्रमाणात हमीभावात धानाची खरेदी केली होती. या वर्षात धान पिकाला पोषक वातावरण, समाधानकारक पाऊस, रोगाचा प्रादुर्भाव कमी व सध्याची धान पिकाची स्थिती लक्षात घेता यंदा धानाची विक्रमी खरेदी होणार आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दिवाळी सण आटोपला की, १५ दिवसांनी आदिवासी विकास महामंडळ आविका संस्थांच्या मार्फतीने हमीभावाने धानाची खरेदी केली जाते. शासनाच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून धान विकल्यास शेतकऱ्यांना मिळणारा बोनसही हेक्टरी बऱ्यापैकी मिळत असल्याने शेतकरी आपला उत्पादित धान हमीभाव खरेदी केंद्रावरच विकण्याला प्राधान्य देत आहेत.
या वर्षात खरिपाच्या धानाची वेळीच उचल झाल्याने धान खरेदीसाठी पुरेशी जागादेखील उपलब्ध आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरिपात खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईचा आणि राईस मिलपर्यंतच्या वाहतुकीचा तिढा काही प्रमाणात सुटल्याने या खरीप हंगामातील धान खरेदीसाठी जागा उपलब्ध असल्याने धानाच्या मोठ्या खरेदीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्याच्या निवडणुका तोंडावर असल्याने बोनस बऱ्यापैकी जाहीर होणार असल्याची शक्यता असल्याने या वर्षात महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात धान खरेदी होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी खरेदी केंद्र सुरू होणार असल्याने आदिवासी विकास महामंडळ व आविका संस्थाने तयारी चालविली आहे.
"प्रतिकूल हवामानामुळे मागच्या वर्षात आरमोरी तालुक्यातील नऊ संस्थांच्या वतीने एक लाख ४३ हजार क्विंटल धानाची खरेदी झाली होती. या वर्षात खरेदीचा आकडा वाढणार असून, वरिष्ठ पातळीवर तयारी चालविली आहे."
- एच. एन. सोनबावणे, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आरमोरी
"मागील तीन ते चार वर्षापासून आदिवासी विकास महामंडळातून उपअभिकर्ता असलेल्या आविका संस्थांना कमिशन कमी मिळत आहे. खरेदी केलेल्या मालाची लवकर उचल होत नसल्याने घटीचे प्रमाण वाढते. त्यामुळे आविका संस्थांचाही विचार करण्यात यावा."
- दिलीप कुमरे, व्यवस्थापक, आविका संस्था देलनवाडी.