यंदा गडचिराेलीत अकरावीच्या साडेपाच हजार जागा शिल्लक राहणार; प्रवेश सहज मिळणार
By दिलीप दहेलकर | Published: May 30, 2024 06:41 PM2024-05-30T18:41:12+5:302024-05-30T18:41:25+5:30
दहावी उत्तीर्ण विद्यार्थी संख्येपेक्षा जागा अधिक, विज्ञान, कला, वाणिज्य, एमसीव्हीसी या चार शाखा मिळून जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या एकूण १७ हजार ९२० जागा आहेत
गडचिराेली : इयत्ता दहावीचा बाेर्डाचा निकाल २७ मे राेजी ऑनलाइन जाहीर झाला असून, गडचिराेली जिल्ह्यातील एकूण १३ हजार २७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गडचिराेली जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या १७ हजारांवर जागा आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी संख्येपेक्षा अकरावी प्रवेशाच्या जागा अधिक असल्याने यंदा शैक्षणिक सत्र २०२४ - २५ मध्ये इयत्ता अकरावीच्या साडेपाच हजार जागा शिल्लक राहणार आहेत.
जिल्ह्यात खासगी अनुदानित, विनानुदानित, जिल्हा परिषद हायस्कूल, शासकीय व खासगी आश्रमशाळा, इंग्रजी माध्यमांच्या शाळा व इतर सर्व शाळा मिळून स्टेट बाेर्डला यंदा १४ हजार २५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले हाेते. यापैकी १३ हजार २७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ६ हजार ७३३ मुले तर ६ हजार ५४५ मुलींचा समावेश आहे. जिल्ह्याच्या शहरी भागात सीबीएसईच्या सात ते आठ माध्यमिक आश्रमशाळा आहेत. या शाळांमधून जवळपास एक हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सीबीएसईचे विद्यार्थी विज्ञान शाखेकडे अधिक वळतात, हा दरवर्षीचा अनुभव आहे. विज्ञान, कला, वाणिज्य, एमसीव्हीसी या चार शाखा मिळून जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या एकूण १७ हजार ९२० जागा आहेत.
चार हजार विद्यार्थी आयटीआय व पाॅलीला जाणार
गडचिराेली जिल्हा मुख्यालयी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. येथे पाच ते सहा शाखा आहेत. याशिवाय बाराही तालुकास्तरावर शासकीय आयटीआय आहे. आयटीआयला जवळपास ३,६०० आणि ४०० विद्यार्थी शासकीय तंत्रनिकेतमध्ये प्रवेश घेतात.
९,२७८ विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेणार?
दहावी उत्तीर्ण १३ हजार ३७४ विद्यार्थ्यांपैकी आयटीआय व पाॅलिटेक्निकचे प्रवेश वगळता उर्वरित ९ हजार २७८ विद्यार्थी यंदा जिल्हयात इयत्ता अकरावीला प्रवेश घेणार आहेत.
अशी हाेईल प्रवेश प्रक्रीया..
माेठ्या शहरांमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी स्पर्धा असते. त्यामुळे तेथे ऑनलाइन प्रक्रिया पार पाडली जाते. नागपूरात केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया हाेईल. उर्वरित चार जिल्ह्यात शासन नियमाप्रमाणे इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. येत्या शैक्षणिक सत्रात एकही विद्यार्थी इयत्ता अकरावीच्या प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असे नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी सांगितले.
गुणवत्ता नसलेल्या शाळांच्या वाढणार अडचणी
नामांकित व गुणवत्तापूर्ण कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी हाेत असते. अशा काॅलेजमध्ये दहावीच्या गुणवत्ता यादीनुसार अकरावीचे प्रवेश हाेत असतात. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी संख्येपेक्षा अकरावी प्रवेशाच्या जागा अधिक असल्याने गुणवत्ता नसलेल्या तसेच नवीन, विनानुदानित शाळांची यंदा अडचण हाेणार आहे.