जिल्हाभर नवागतांच्या स्वागताने यावर्षीच्या शालेय सत्राला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 05:00 AM2022-06-30T05:00:00+5:302022-06-30T05:00:11+5:30
शाळेच्या प्रवेशद्वारावर रंगरंगाेटी, फुलझाडे, फुगे व इतर साहित्यांनी सजावट करून शाळेला नवीन लूक देण्यात आला. विद्यार्थ्यांनीही नवीन कपडे घालून तसेच काही विद्यार्थी टाेप्या घालून या उत्साहात सहभागी झाले. गावपातळीवरील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक व पालकांनी प्रवेशाेत्सव कार्यक्रमाला हजेरी लावून विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा उत्साह द्विगुणित केला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : यंदाचे शैक्षणिक सत्र २७ जूनपासून सुरू झाले असले तरी जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या शाळांमध्ये बुधवारपासून (दि. २९) वर्ग भरण्यास सुरुवात झाली. शाळेचा हा पहिलाच दिवस असल्याने पाठ्यपुस्तके, गणवेश, फुगे, पुष्पगुच्छ देऊन शाळेत प्रथमच पाय ठेवणाऱ्या इयत्ता पहिलीतील १५ हजारांवर विद्यार्थ्यांचे जाेरदार स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
बुधवारपासून जि. प. च्या जिल्ह्यातील सर्वच १५१३ तसेच देसाईगंज, आरमोरी आणि गडचिराेली न. प.च्या शाळा सुरू झाल्या. शिक्षण विभागाच्या वतीने नवागतांच्या स्वागतासाठी प्रवेशाेत्सव कार्यक्रमाचे नियाेजन करण्यात आले होते. सर्वच शाळांमध्ये सॅनिटायझर, हॅन्डवाॅश आदी उपलब्ध करून देण्यात आले. या दाेन्ही वस्तूंचा विद्यार्थ्यांनी वापर केला. काही शाळांमधील विद्यार्थी मास्क घालून आल्याचे दिसून आले.
६० हजारांवर विद्यार्थ्यांना दिली पाठ्यपुस्तके
शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वच शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या ६० हजारांवर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. शालेय पाेषण आहाराची अंमलबजावणी पहिल्या दिवशीपासून सुरू करण्यात आली असून, जि. प.च्या सर्वच शाळांमध्ये पहिल्या दिवशी आहार शिजवून ताे विद्यार्थ्यांना देण्यात आला, अशी माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
शाळेच्या प्रवेशद्वारावर रंगरंगाेटी, फुलझाडे, फुगे व इतर साहित्यांनी सजावट करून शाळेला नवीन लूक देण्यात आला. विद्यार्थ्यांनीही नवीन कपडे घालून तसेच काही विद्यार्थी टाेप्या घालून या उत्साहात सहभागी झाले. गावपातळीवरील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक व पालकांनी प्रवेशाेत्सव कार्यक्रमाला हजेरी लावून विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा उत्साह द्विगुणित केला.
अनेक शाळांमध्ये पहिल्याच दिवशी पंगत
- गडचिराेली पंचायत समितीअंतर्गत पाेर्ला, नगरी, साखरा, गाेगाव व इतर शाळांमध्ये पहिल्याच दिवशी शालेय पाेषण आहार शिजवून विद्यार्थ्यांना स्वादिष्ट व गाेड जेवण देण्यात आले. विशेष म्हणजे नगरी जि. प. शाळेत विद्यार्थ्यांची भाेजनाची पंगत लावून सामूहिक भाेजन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनीही पाेषण आहाराचा आस्वाद घेतला.
शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली धानाेरातील शाळांना भेट
- जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी ए. एफ. धामने यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी बुधवारला धानाेरा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला भेट देऊन तेथील साेयीसुविधांची पाहणी केली. याशिवाय कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला भेट देऊन तेथील विद्यार्थिनींशी संवाद साधला.
- शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित हाेते.