रोपवाटिकेच्या पाण्यावर भागवितात तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 01:03 AM2018-05-21T01:03:04+5:302018-05-21T01:03:04+5:30

येथील नळ योजनेच्या विहिरीचे बांधकाम सुरू असल्याने मागील तीन महिन्यांपासून नळाला पाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे नागरिकांना रोपवाटिकेतील पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे.

 Thorns feed on nursery water | रोपवाटिकेच्या पाण्यावर भागवितात तहान

रोपवाटिकेच्या पाण्यावर भागवितात तहान

Next
ठळक मुद्देजोगीसाखरातील स्थिती : नळ योजनेच्या विहिरीचे बांधकाम सुरू असल्याने तीन महिन्यापासून योजना बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : येथील नळ योजनेच्या विहिरीचे बांधकाम सुरू असल्याने मागील तीन महिन्यांपासून नळाला पाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे नागरिकांना रोपवाटिकेतील पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई येथे निर्माण झाली आहे.
पाणी पुरवठा विभाग कुरखेडाच्या वतीने २०१४-१५ या वर्षात जोगीसाखरा लगतच्या नदीमध्ये नळ योजनेच्या विहिरीचे बांधकाम करण्यात आले होते. सदर काम करताना जुनी चांगली फिल्टर पाईपलाईन काढून चुकीची नवीन पाईपलाईन व विहीर बांधकाम करण्यात आले. नदीतील विहिरीत बोअरवेल मारले असते तर सुरळीत पाणीपुरवठा झाला असता परंतु नव्याने परत जवळपास नऊ लाख रूपये मंजूर करून नवीन विहीर बांधकामाचे काम हाती घेण्यात आले. सध्या या विहिरीचे बांधकाम नदीत सुरू आहे. नदीपात्रात तीन ते चार फुटापेक्षा अधिक रेतीचा थर नसल्याने विहिरीला पाणी लागले नाही. विहिरीत कुठेतरी झरा मिळेल म्हणून नदीमध्ये शोध सुरू आहे. येथील विहिरी आणि हातपंपांना पाणी येत नसल्यामुळे एक ते दीड किमी अंतरावरून रोपवाटिकेतून पिण्याचे पाणी नागरिकांना आणावे लागते. जोगीसाखरा येथे दिवसेंदिवस पाणी टंचाईची समस्या तीव्र होत असल्याने शासनाने गाढवी नदीवर कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
बंधारे बांधण्याची मागणी
गाढवी नदीचे पाणी आटले की, नदी तिरावरील गावांना पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे या नदीवर मोठे सिंचन बंधारे बांधकाम करण्याची गरज आहे. जोगीसाखरा भागातून वाहणाऱ्या गाढवी नदीवरून परिसरातील अनेक गावांमध्ये नळयोजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यात प्रत्येक ठिकाणच्या नळयोजना पाणी ओढत असल्याने नदीतील जलपातळी आपोआपच खालावते. दरवर्षी या नदीवर बंधारे बांधून पाणी अडविले जायचे परंतु मागील दोन वर्षांपासून पाणी अडविले जात नसल्याने नदीतील जलसाठा लवकरच आटतो. त्यामुळे मोठे बंधारे बांधण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title:  Thorns feed on nursery water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.