नववर्षानिमित्त चारही मार्गावर वाहनांची कसून तपासणी
By admin | Published: January 1, 2017 01:35 AM2017-01-01T01:35:58+5:302017-01-01T01:35:58+5:30
नववर्षानिमित्त गडचिरोली शहरात दारू विक्रीसाठी आणण्याची शक्यता लक्षात घेऊन गडचिरोली शहरातील
गडचिरोली : नववर्षानिमित्त गडचिरोली शहरात दारू विक्रीसाठी आणण्याची शक्यता लक्षात घेऊन गडचिरोली शहरातील चारही मुख्य मार्गावर पोलीस तैनात करून चारचाकी तसेच दुचाकी वाहनांची कडक तपासणी केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी छत्तीसगड राज्यातून तसेच गोंदिया, भंडारा जिल्ह्यातून चोरीछुपी मार्गाने दारू आणली जाते. नववर्षानिमित्त ओल्या पार्ट्यांचे आयोजन केले जात असल्याने दारूची मागणी वाढते. त्यामुळे या कालावधीत दारूचा भाव दामदुप्पट होतो. या संधीचा फायदा उचलण्यासाठी दारूविक्रेते शहरात दारूविक्रीस आणतात. हा दरवर्षीचा अनुभव असल्याने पोलिसांनी सायंकाळपासूनच धानोरा, चामोर्शी, आरमोरी व चंद्रपूर मार्गावर स्वतंत्र पथकांच्या माध्यमातून तपासणी सुरू केली. चारचाकी व दुचाकी वाहनांचीही यादरम्यान तपासणी केली जात होती.
शहरातील इंदिरा गांधी चौकामध्येही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे रात्री १० वाजेनंतर चौकातील गर्दी आपोआप कमी झाली.
उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांनीही अवैध दारूविक्रेत्यांच्या विरोधात मागील तीन महिन्यांपासून चांगलीच कंबर कसली आहे. त्यामुळे गडचिरोली शहरात होणारा दारूचा पुरवठा कमी झाला आहे. परिणामी शहरात दारूची टंचाई निर्माण झाली आहे. पोलिसांच्या धास्तीने दारूविक्रेते दारूविक्री करण्यास तयार नाही. पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने अशा प्रकारच्या कारवायांमध्ये सातत्य ठेवण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)